Home राजकारण ADCC बँक – शिंदेंची गुगली, विखेंचा पॅट, थोरातांचा डाव! छाननीत १० बडे...

ADCC बँक – शिंदेंची गुगली, विखेंचा पॅट, थोरातांचा डाव! छाननीत १० बडे नेते अडकले, २ बिनविरोध फिक्स

0
3
ADCC बँक – शिंदेंची गुगली, विखेंचा पॅट, थोरातांचा डाव! छाननीत १० बडे नेते अडकले, २ बिनविरोध फिक्स

जामखेड न्युज – – – – – 

ADCC बँक – शिंदेंची गुगली, विखेंचा पॅट, थोरातांचा डाव! छाननीत १० बडे नेते अडकले, २ बिनविरोध फिक्स

आशिया खंडातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची छाननी प्रक्रिया काल रात्र उशिरापर्यंत चालली. एकूण ८४६ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली असून ३५० हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्यासमोर झालेल्या छाननीत अनेक बड्या नेत्यांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या. आज मंगळवार दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर ७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान माघारीची प्रक्रिया होणार आहे. २ नोव्हेंबरला मतदान आणि ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

छाननीत कोण अडकले?

राहाता मतदारसंघातून माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार राहुल जगताप, आमदार किरण लहामटे, आमदार मोनिका राजळे, चंद्रशेखर घुले, सीताराम गायकर, अंबादास पिसाळ यांच्या अर्जावर हरकती दाखल झाल्या. रद्द झालेल्या व अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या नावाने काही अर्ज दाखल झाल्याचे निदर्शनास आले. ऑडिट, ठराव, आधार यांसारखी कागदपत्रे न जोडल्याने काही अर्जांना आज दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर १० वर्षांपेक्षा जास्त काळ संचालक राहिल्याच्या कारणावरून घेतलेल्या हरकती फेटाळण्यात आल्या आहेत.

बिनविरोधचे काय?

संगमनेर येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बँक निवडणूक बिनविरोध करण्याचा ठराव झाला होता. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बिनविरोधची हाक दिली होती. मात्र ८४६ अर्ज विक्री झाल्याने बिनविरोध एक्स्प्रेसला ब्रेक लागला आहे.

आतापर्यंत दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत – नेवासा मतदारसंघातून माजी मंत्री शंकरराव गडाख आणि संगमनेर मतदारसंघातून बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजितसिंह देशमुख यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध निवडले गेले आहेत.

राहाता येथून डॉ. सुजय विखे, शेवगाव येथून चंद्रशेखर घुले आणि कोपरगाव येथून विवेक कोल्हे यांच्या जागा बिनविरोध होण्याच्या मार्गावर असून माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

सभापती प्रा. राम शिंदे यांची भूमिका निर्णायक

या निवडणुकीतील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची माघार. कर्जत-जामखेडमध्ये दोन्ही तालुक्यातील विकास संस्थांचे बिनविरोध ठराव घेऊन शिंदे यांनी स्वतः अर्ज घेतला होता. “एकाच जागेसाठी २१ अर्ज, २६ पॅनल तयार होऊ शकतात, आत्मकेंद्री राजकारण करू नये” असा इशाराही त्यांनी दिला होता.

मात्र ५ ऑक्टोबर रोजी त्यांनी निवडणुकीतून माघार जाहीर केली. सभापती पदाची प्रतिष्ठा व निष्पक्षता राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “मी निवडणूक लढवत नसलो तरी डबल गतीने लक्ष ठेवणार आणि कार्यकर्त्यांना ताकद देणार” असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी तिसऱ्या अपत्याच्या मुद्द्यावरून शिंदे यांच्यावर टीका केली होती. यावर बोलताना शिंदे म्हणाले, “चुकीचे लोक कोण आहेत हे सांगावे, काही शब्द विसरता येत नाहीत.” तर संगमनेरच्या बैठकीची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाच नव्हती असा दावाही समोर आला आहे.

पुढे काय?

आता सर्वांचे लक्ष २१ ऑक्टोबरच्या माघारीकडे लागले आहे. विखे-थोरात एकत्र येऊन महायुतीचा पॅनल बिनविरोध करणार का, की विस्थापितांचा वेगळा पॅनल रिंगणात येणार? जिल्हा बँकेच्या तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार हे माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!