शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामातील अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर दुसऱ्याच दिवशी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड रोडवरील शासकीय दूध डेअरी परिसरापासून सुरू झालेली धडक कारवाई पहिल्या दिवशी टपऱ्या आणि बाजार समितीच्या गाळ्यांपर्यंत पोहोचली; मात्र समर्थ हॉस्पिटल ते बीड रोड कॉर्नर या परिसरात आल्यानंतर कारवाईचा वेग अचानक मंदावल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेला मंगळवारी सकाळी दहा वाजता सुरुवात झाली. महसूल विभाग, नगरपरिषद, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने बीड रोडवरील शासकीय दूध डेअरी परिसरापासून कारवाई सुरू केली. प्रांताधिकारी नितीन पाटील, तहसीलदार शितल सावळे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे आणि पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्गाच्या गटारापासून दोन्ही बाजूंना सुमारे दहा फूट म्हणजेच तीन मीटर अंतरातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली.
पहिल्या दिवशी अनेक लहान-मोठ्या टपऱ्या तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे बीड रोडचा काही भाग मोकळा झाला. मात्र, दुसऱ्या दिवशी समर्थ हॉस्पिटल परिसरानंतर मोठ्या व पक्क्या बांधकामांवर कारवाईचा वेग कमी झाल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले आहेत. मोजणीतील तफावतीमुळे संभ्रम राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि भूमिअभिलेख विभागाच्या मोजमापात तफावत असल्याचे समोर आल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. संयुक्त मोजणीनुसार अतिक्रमणाच्या हद्दी निश्चित झाल्या असतील, तर त्याच निकषानुसार सर्वच ठिकाणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
एकीकडे लहान व्यावसायिकांच्या टपऱ्यांवर तातडीने कारवाई होत असताना दुसरीकडे मोठ्या आणि पक्क्या बांधकामांच्या बाबतीत कारवाईचा वेग कमी झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे प्रशासनाची कारवाई सर्वांसाठी समान आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
‘मोठ्या बांधकामांवर कारवाई का थांबली?’ नागरिकांचा सवाल समर्थ हॉस्पिटल ते बीड रोड कॉर्नर दरम्यान कारवाई थांबल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली. प्रशासनाने कोणत्याही व्यक्तीचा किंवा व्यवसायाचा विचार न करता अधिकृत मोजणी आणि निश्चित केलेल्या हद्दीनुसार समान पद्धतीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी प्रशासनाला कारवाईत कोणताही भेदभाव न करण्याचे आवाहन केले. संयुक्त मोजणीनुसार हद्दीच्या खुणा निश्चित झाल्या असतील, तर त्या आधारे सर्व अतिक्रमणे समान निकषाने हटविणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले.
चौकट पत्रकारांच्या प्रश्नावर उपअभियंत्यांशी वाद
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता सुजित चेमटे हे समर्थ व्हेज हॉटेलमध्ये बसले असताना पत्रकारांनी त्यांच्याकडे अतिक्रमण हटाव कारवाई दुपारनंतर का थांबली, याबाबत विचारणा केली. यावेळी चेमटे यांनी, ‘मी तुम्हाला बांधील नाही. तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. हे प्रश्न राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकारी ज्योती शिंदे यांना विचारा,’ असे सांगितल्याचा आरोप पत्रकारांनी केला. या प्रकाराबाबत पत्रकारांनी प्रांताधिकारी नितीन पाटील आणि तहसीलदार शितल सावळे यांच्याकडे माहिती देत नाराजी व्यक्त केली. पत्रकारांशी अशा प्रकारे बोलणाऱ्या अधिकाऱ्याच्या वर्तनाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पत्रकारांकडून करण्यात आली.
चौकट व्यापाऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
जामखेड शहरातील व्यापाऱ्यांनी तहसीलदार शितल सावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यापूर्वी करण्यात आलेली अधिकृत मोजणीच ग्राह्य धरावी, तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या गटारीपासून दहा फूट अंतराची मर्यादा स्पष्टपणे निश्चित करून त्यानुसार पारदर्शक पद्धतीने कारवाई करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. अधिकृत आणि स्पष्ट मोजणी असेल, तर जिथे प्रत्यक्ष अतिक्रमण आहे ते स्वतःहून काढून घेण्यास आम्ही तयार आहोत. आमचा विकासाला विरोध नाही; मात्र विकासाची प्रक्रिया स्पष्ट मोजणी, समान निकष आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे,’ अशी भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली.
चौकट कारवाई सर्वांसाठी समान होणार का? अवधूत पवार
अतिक्रमण हटाव मोहीम ही शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, कारवाई करताना समान निकष लागू होत नसल्याची भावना निर्माण झाली तर प्रशासनाच्या मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्यामुळे संयुक्त मोजणी अंतिम करून, त्याच आधारे कोणताही भेदभाव न करता संपूर्ण अतिक्रमण हटाव मोहीम पूर्ण करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. आता प्रशासन समर्थ हॉस्पिटल ते बीड रोड कॉर्नर दरम्यानची कारवाई कधी आणि कोणत्या निकषाने सुरू करते, याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.