Home राजकारण गोरगरिबांच्या टपऱ्यांवर कारवाई, धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर ‘मेहरबानी’ का? १ ऑक्टोबरच्या टंचाई आढावा...

गोरगरिबांच्या टपऱ्यांवर कारवाई, धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर ‘मेहरबानी’ का? १ ऑक्टोबरच्या टंचाई आढावा बैठकीत जामखेडकरांचा ‘निर्णायक’ सवाल!

0
3
गोरगरिबांच्या टपऱ्यांवर कारवाई, धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर ‘मेहरबानी’ का?  १ ऑक्टोबरच्या टंचाई आढावा बैठकीत जामखेडकरांचा ‘निर्णायक’ सवाल!

जामखेड न्युज – – – – – 

गोरगरिबांच्या टपऱ्यांवर कारवाई, धनदांडग्यांच्या अतिक्रमणावर ‘मेहरबानी’ का?

१ ऑक्टोबरच्या टंचाई आढावा बैठकीत जामखेडकरांचा ‘निर्णायक’ सवाल!

कर्जत-जामखेड तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारा व पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी बुधवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी जामखेड येथील राज लॉन्स येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.

पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच जनावरांच्या चाऱ्याची संभाव्य टंचाई यामुळे शेतकरी व पशुपालकांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून शेतकऱ्यांना कोणती मदत मिळणार, चारा व पाण्याची उपलब्धता कशी केली जाणार आणि टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन कोणत्या उपाययोजना करणार, याबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील पाणीटंचाई, चारा उपलब्धता, खरीप पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा प्रशासनाकडून आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरच्या बैठकीत शासनाकडून कोणते निर्णय घेतले जातात, याकडे शेतकरी व पशुपालकांचे लक्ष लागले आहे.

अतिक्रमणाच्या प्रश्नावरही ‘जाब’ विचारला जाणार का?
दरम्यान, टंचाईच्या प्रश्नासोबतच जामखेड शहरातील अतिक्रमण आणि रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्नही १ ऑक्टोबरच्या बैठकीत चर्चेला येणार का, असा सवाल जामखेडकरांमधून उपस्थित केला जात आहे.

एप्रिल २०२५ मध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जामखेड शहरातील अतिक्रमण तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत अहवाल मागवून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी मुंबईतील विधानभवन तसेच अहिल्यानगर येथे झालेल्या विविध बैठकींत अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जाते.

मात्र, या आदेशांनंतरही जामखेड शहरातील अनेक अतिक्रमणे कायम असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ‘आदेश झाले, बैठका झाल्या; मग अतिक्रमण हटले का नाही?’ असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
हातावर पोट असणाऱ्या गोरगरिबांच्या टपऱ्यांवर कारवाई करताना प्रशासन तत्परता दाखवते; मात्र मोठ्या अतिक्रमणांवर कारवाईची वेळ आली की प्रशासनाची भूमिका संथ का होते, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे काम आणि अतिक्रमणाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने यावर ठोस निर्णय होण्याची नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे १ ऑक्टोबरच्या टंचाई आढावा बैठकीत चारा-पाण्याच्या प्रश्नासोबत जामखेडच्या अतिक्रमणाचा आणि रखडलेल्या महामार्गाचा प्रश्नही चर्चेला येणार का? याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.
– अवधूत पवार
सामाजिक कार्यकर्ते

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!