हराळे कुटुंबीयांच्या ऐतिहासिक देखाव्याने वेधले नागरिकांचे लक्ष
जामखेड शहरात यंदाही गौरी-गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गणरायाच्या आगमनानंतर घरोघरी गौरी अर्थात महालक्ष्मीचे आगमन झाले. या उत्सवाच्या निमित्ताने शहरातील अनेक कुटुंबांनी सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक विषयांवरील आकर्षक देखावे साकारत परंपरेला आधुनिकतेची जोड दिली.
यामध्ये शहरातील जुन्या स्टेट बँकेजवळील हराळे कुटुंबीयांनी साकारलेला ऐतिहासिक देखावा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील पावनखिंड आणि विशाळगडाशी संबंधित प्रसंग देखाव्याच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. महाराज पन्हाळगडावर असताना सिद्दी जौहरने घातलेला वेढा, त्यातून महाराजांची सुटका, पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी दिलेला लढा आणि त्यानंतर महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचल्याचा ऐतिहासिक क्षण या देखाव्यातून मांडण्यात आला आहे.
आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात तरुणाईचा इतिहासाशी संपर्क कमी होत असताना, नव्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, किल्ल्यांचे महत्त्व आणि स्वराज्याचा इतिहास समजावा, या उद्देशाने हा देखावा उभारण्यात आल्याचे हराळे कुटुंबीयांनी सांगितले.
विजय हराळे, मनिषा हराळे आणि महेश हराळे यांनी हा देखावा साकारण्यासाठी पुढाकार घेतला. किल्ल्याची रचना, ऐतिहासिक प्रसंग आणि त्यामागील संकल्पना पाहण्यासाठी नागरिक तसेच विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने गर्दी केली. मनोरंजनासोबतच इतिहासाची ओळख करून देणारा हा उपक्रम असल्याने नागरिकांकडून त्याचे कौतुक करण्यात आले.
दरम्यान, शहरासह जामखेड तालुक्यातील विविध गावांमध्येही गौरी-गणपतीच्या निमित्ताने घरोघरी विविध देखावे साकारण्यात आले होते. सामाजिक संदेश, धार्मिक परंपरा, सांस्कृतिक वारसा तसेच ऐतिहासिक प्रसंग यांची मांडणी या देखाव्यांमधून करण्यात आली.
गणेशमूर्तीचे १५ सप्टेंबर रोजी आगमन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी घरोघरी गौरी अर्थात महालक्ष्मीचे आगमन झाले. १८ सप्टेंबर रोजी महालक्ष्मीची पूजा करण्यात आली, तर १९ सप्टेंबर रोजी गौरी-महालक्ष्मीचा उत्सव उत्साहात पार पडला. शहरातील सुरेश जगदाळे यांच्या कुटुंबीयांनीही मुले, सुना व नातवंडांसह दरवर्षीप्रमाणे यंदाही गौरी-गणपतीची भक्तिभावाने पूजा केली.
चौकट
गौरी-गणरायाकडे पावसासाठी साकडे! दुष्काळाच्या छायेत उत्सव; बारा-पंधरा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा जामखेड परिसरात सध्या दुष्काळी परिस्थिती गंभीर झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही नागरिकांसमोर उभा राहिला आहे. अनेक भागांत बारा ते पंधरा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे गौरी-गणपतीच्या उत्सवादरम्यान महिलांसह नागरिकांनी गणराय आणि महालक्ष्मीसमोर चांगल्या पावसासाठी साकडे घालत परिसरावरील दुष्काळाचे सावट दूर करण्याची प्रार्थना केली.