Sunday, September 13, 2026
Home ताज्या बातम्या मनोज जरांगे पाटीलांचा अवमान केल्याच्या आरोपावरून तरुण ताब्यात, खर्डा पोलिसांची २४ तासांत...

मनोज जरांगे पाटीलांचा अवमान केल्याच्या आरोपावरून तरुण ताब्यात, खर्डा पोलिसांची २४ तासांत कारवाई

0
2
मनोज जरांगे पाटीलांचा अवमान केल्याच्या आरोपावरून तरुण ताब्यात, खर्डा पोलिसांची २४ तासांत कारवाई

जामखेड न्युज – – – – – – 

मनोज जरांगे पाटीलांचा अवमान केल्याच्या आरोपावरून तरुण ताब्यात, खर्डा पोलिसांची २४ तासांत कारवाई

मनोज जरांगे पाटील यांच्या AI तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या फोटोचा कथित आक्षेपार्ह वापर करून तो WhatsApp स्टेटसवर ठेवल्याने जामखेड तालुक्यातील नायगाव परिसरात वाद निर्माण झाला. या स्टेटसमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत नायगाव येथील युवक व नागरिकांनी खर्डा पोलिसांकडे धाव घेत संबंधित तरुणावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी खर्डा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला २४ तासांच्या आत ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल तोंडे (रा. सतेवाडी, पोस्ट नायगाव, ता. जामखेड) याने आपल्या मोबाईलवरून AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांचा फोटो तयार करून तो WhatsApp स्टेटसवर ठेवल्याचा आरोप आहे. सदर स्टेटससोबत त्याने “96 कुळी कट्टर मराठा म्हणणारे पोर आजपर्यंत मला एक शब्दसुद्धा बोलले नाही” अशा आशयाचा संदेश केल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे.

हा प्रकार नायगाव येथील मराठा समाजातील काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित तरुणाला सदर फोटो व स्टेटस काढून टाकण्यास सांगितले. मात्र, त्याने स्टेटस काढण्यास नकार देत “तुम्हाला काय करायचे ते करा” अशा स्वरूपाचे उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संभाषणाचे रेकॉर्डिंगही करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे नायगाव येथील सुमारे ४० ते ५० युवक व प्रतिष्ठित नागरिक खर्डा पोलीस ठाण्यात दाखल झाले. संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

या तक्रारीच्या अनुषंगाने विठ्ठल तोंडे याच्याविरुद्ध खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १५९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३५३(५), ३५६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी तात्काळ पोलिसांचे पथक रवाना केले. या पथकातील पोहेकॉ. संभाजी शेंडे व पो.कॉ. शशी म्हस्के यांनी आरोपीचा शोध घेत त्याला जामखेड परिसरातून २४ तासांच्या आत ताब्यात घेतले.
या कारवाईमुळे सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर किंवा फोटो प्रसारित करून सामाजिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी कायद्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. क्षीरसागर करीत आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्गे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खर्डा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर, तसेच पोलीस अंमलदार संभाजी शेंडे, संदिप धामने आणि शशी म्हस्के यांनी कारवाईत सहभाग घेतला.
सोशल मीडियावरील एका स्टेटसमुळे सुरू झालेला वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आणि पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला ताब्यात घेतल्याने या प्रकरणाची परिसरात चर्चा सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!