जामखेड न्युज – – – – – –
“काळ बदलतोय, शिक्षकांनीही बदलले पाहिजे!” – शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे
ल. ना. होशिंग उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात, सादिक शेख यांचा सेवापूर्तीबद्दल सपत्नीक सन्मान
ल. ना. होशिंग उच्च माध्यमिक विद्यालय, जामखेड येथे शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी शिक्षकांनी काळानुसार स्वतःमध्ये बदल करून माहिती तंत्रज्ञानाच्या युगाशी जुळवून घेण्याचे आवाहन केले. “शिक्षकी पेशा हा व्यवसाय नसून एक ध्यास आहे.

समाजात शिक्षकाचे स्थान आजही आबाधित असून, राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,” असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पूजा कोल्हे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद करत “शिक्षकी पेशा हा केवळ व्यवसाय नसून विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याचा ध्यास आहे,” असे सांगितले.

कार्यक्रमास शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, संचालक डॉ. प्रताप गायकवाड, गटशिक्षणाधिकारी धनंजय बोंदार्डे, प्राचार्य बी. ए. पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, पर्यवेक्षक सुदाम वराट, पत्रकार नासीर पठाण, सर्फराज पठाण, सतीश डुचे, गायवळ सर, एकदिवसीय प्राचार्य सुजित टेकाळे, उपप्राचार्य गायत्री जाधव आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी साकारल्या शिक्षकांच्या भूमिका
शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शाळेतील विविध शिक्षकांच्या भूमिका साकारत एक दिवसासाठी शिक्षकाची जबाबदारी सांभाळली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या अध्यापनशैलीचे अनुकरण करत वर्गात अध्यापन केले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
३४ वर्षांच्या सेवेनंतर सादिक शेख सरांचा सपत्नीक सन्मान
विद्यालयात तब्बल ३४ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले सादिक शेख सर यांचा सेवापूर्ती निमित्त सपत्नीक सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सादिक शेख यांनी आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा दिला. भैरवनाथ विद्यालय, हळगाव येथे दोन वर्षे सेवा करताना तेथील कुस्तीपटूंनी राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली, अशी आठवण त्यांनी सांगितली.





