शहरातील जय हिंद चौक परिसरातील सचिन प्रोव्हिजन स्टोअर्स या किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या आरोपींना जामखेड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ताब्यात घेतले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून चोरीचा माल तसेच दुकानाचे शटर तोडण्यासाठी वापरलेली लोखंडी कटर जप्त केली आहे. या कारवाईमुळे शहरातील चोरट्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.
दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.३० ते २७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान जय हिंद चौक, जामखेड येथील सचिन प्रोव्हिजन स्टोअर्स या किराणा दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील सुमारे ₹४,४७२ किमतीचा किराणा माल चोरून नेण्यात आला होता.
या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच जामखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जामखेड शहर तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये शोधमोहीम राबवून करण अशोक पवार (वय २०) आणि अनिल गौतम काळे (वय २१) या दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला ₹४,४७२ किमतीचा किराणा माल तसेच दुकानाचे शटर तोडण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी कटर जप्त करण्यात आली.
या गुन्ह्यातील किरण ऊर्फ खंड्या रावसाहेब काळे आणि रोहित अशोक काळे, रा. मिलिंदनगर, भुतवडा रोड, जामखेड, हे दोघे सध्या फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंमका, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी आणि SDPO सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक अजित मोरे, सहाय्यक फौजदार शिवाजी कदम, पोहेकॉ संजय लोखंडे, पोहेकॉ ईश्वर माने, पोहेकॉ गणेश ढोबळे, पोहेकॉ दिपक बोराट, पोहेकॉ कुलदीप घोडके, पोहेकॉ ज्ञानेश्वर बळेकर, मपोका रतनमाला हराळे यांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ संजय लोखंडे करीत आहेत.