Wednesday, August 26, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्यात बिबट्याचा वावर, वनविभाग सतर्क, नागरिकांना विशेष खबरदारीचे आवाहन ...

जामखेड तालुक्यात बिबट्याचा वावर, वनविभाग सतर्क, नागरिकांना विशेष खबरदारीचे आवाहन रत्नापूरच्या रानमळा परिसरात पाळीव कुत्र्याची शिकार, उसाच्या शेतात बिबट्याचे ठसे आढळले

0
2
जामखेड तालुक्यात बिबट्याचा वावर, वनविभाग सतर्क, नागरिकांना विशेष खबरदारीचे आवाहन   रत्नापूरच्या रानमळा परिसरात पाळीव कुत्र्याची शिकार, उसाच्या शेतात बिबट्याचे ठसे आढळले

जामखेड न्युज – – – – – 

जामखेड तालुक्यात बिबट्याचा वावर, वनविभाग सतर्क, नागरिकांना विशेष खबरदारीचे आवाहन

रत्नापूरच्या रानमळा परिसरात पाळीव कुत्र्याची शिकार, उसाच्या शेतात बिबट्याचे ठसे आढळले

तालुक्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी सौताडा घाट परिसरात बिबट्या दिसून आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी मौजे रत्नापूर येथील रानमळा परिसरात बिबट्याच्या वावराची घटना समोर आली आहे.

अमोल वारे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी भ्रमणध्वनीवरून माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या पथकाने संबंधित शेताची पाहणी केली. यावेळी पाळीव कुत्र्याची शिकार झाल्याचे तसेच उसाच्या शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले असून वनविभागाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

अहिल्यानगर वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल तसेच सहाय्यक वनसंरक्षक गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती स्मिता हराळ यांनी जामखेड तालुक्यातील नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. बिबट्याचा वावर आढळलेल्या परिसराच्या सुमारे पाच किलोमीटर परिघातील नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी
रात्रीच्या वेळी घराबाहेर उघड्यावर झोपू नये. रात्री एकट्याने परिसरात फिरणे टाळावे. अपरिहार्य कारणासाठी बाहेर पडावे लागल्यास शक्यतो समूहाने जावे. शेतात जाताना विशेषतः पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी एकटे जाणे टाळून दोन-तीन जणांनी एकत्र जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पशुधन उघड्यावर न बांधता सुरक्षित आणि बंदिस्त गोठ्यात ठेवावे. गोठ्याच्या आजूबाजूला पुरेसा प्रकाश असावा. घरासमोरही रात्रीच्या वेळी पुरेसा उजेड ठेवावा. लहान मुले, महिला आणि वृद्ध व्यक्तींना रात्रीच्या वेळी एकटे सोडू नये.
शेतात किंवा रस्त्यावरून जाताना टॉर्च, काठी सोबत ठेवावी. मोठ्याने बोलणे, समूहाने जाणे किंवा आवाज करत चालणे यामुळे मानवी उपस्थितीची चाहूल लागण्यास मदत होऊ शकते. घराभोवती आणि गोठ्याभोवती वाढलेली झुडपे व दाट गवत काढून परिसर स्वच्छ ठेवावा, जेणेकरून वन्यप्राण्याला लपण्यासाठी जागा कमी राहील.

लहान मुलांना संध्याकाळनंतर घराबाहेर किंवा शेतात एकटे खेळू देऊ नये. पाळीव कुत्रे, वासरे, शेळ्या यांना उघड्यावर बांधू नये. उसासारख्या दाट पिकांमध्ये काम करताना आजूबाजूच्या परिसराकडे सतत लक्ष ठेवावे.

बिबट्या दिसल्यास काय करू नये?
बिबट्या दिसल्यास त्याच्या मागे धावू नये, दगड मारू नये किंवा त्याला घेरण्याचा प्रयत्न करू नये. बिबट्याची पिल्ले आढळल्यास त्यांना हात लावू नये किंवा उचलून आणू नये. परिसरात त्यांची आई असण्याची शक्यता असल्याने सुरक्षित अंतर ठेवावे.

तसेच सोशल मीडियावर बिबट्याबाबत खोट्या अफवा, जुने व्हिडिओ किंवा एआयच्या माध्यमातून तयार केलेले बनावट व्हिडिओ प्रसारित करून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
वनविभागाचे पथक तैनात
जामखेड तालुक्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी जामखेड परिमंडळातील वनपरिमंडळ अधिकारी श्री. नारायण दराडे यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक रवी राठोड, शांतिनाथ सपकाळ, नागेश तेलंगे, धर्मवीर तोरंबे तसेच वनसेवक शिवाजी चिलगर, शाम डोंगरे, राघू सुरवसे, शरद सूर्यवंशी, माणिक महारनवर, हरिश्चंद्र माळशिकारे, भाऊसाहेब भोगल आदींची नेमणूक करण्यात आली आहे.

पशुधनाचे नुकसान झाल्यास किंवा बिबट्या आढळून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ स्थानिक वनरक्षक अथवा वनपरिक्षेत्र कार्यालयाशी संपर्क साधावा. नागरिकांनी सतर्क राहावे, मात्र अफवांवर विश्वास ठेवू नये, असे वनविभागाने आवाहन केले आहे.
वनविभागाचा स्पष्ट संदेश : “सतर्क राहा, अफवांपासून दूर राहा आणि बिबट्याला त्रास देऊ नका!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!