जामखेड न्युज – – – – – –
नानज प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकी; शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार

नानज (ता. जामखेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २१ ऑगस्ट रोजी रुग्ण तपासणी सुरू असताना एका व्यक्तीने वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच दवाखाना बॉम्बने उडवून देण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी स्मिता सुरेश भोरे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी अश्विनी परसराम झगडे, लक्ष्मण रंगनाथ ठोसर, अविनाश अर्जुन तोरडमल आणि हसीना बिनतेशब्बीर शेख आदी कामावर उपस्थित होते.

यावेळी कृष्णा प्रकाशसिंग राजपूत हे तेथे आले. रुग्णांच्या उपचारासंदर्भात झालेल्या वादातून त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत मोठमोठ्याने शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दवाखान्यात इतर रुग्ण उपचारासाठी उपस्थित असल्याने शांतता राखण्यास सांगितल्यानंतरही संबंधित व्यक्तीने आक्रमक भूमिका घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची तसेच दवाखाना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तसेच संबंधित व्यक्तीने चुकीचा रिपोर्ट का दिला, असा जाब विचारत पुन्हा शिवीगाळ केली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येत दमदाटी करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.




