सूर्यफुलाची शेती हद्दपार; गवळवाडीत मात्र फुलला ‘सेल्फी पॉईंट’ तेलवर्गीय पिकांकडे शेतकऱ्यांची पाठ; ज्ञानेश्वर थोरात यांच्या शेतातील सूर्यफुलांनी वेधले नागरिकांचे लक्ष
सूर्यफुलाची शेती हद्दपार; गवळवाडीत मात्र फुलला ‘सेल्फी पॉईंट’
तेलवर्गीय पिकांकडे शेतकऱ्यांची पाठ; ज्ञानेश्वर थोरात यांच्या शेतातील सूर्यफुलांनी वेधले नागरिकांचे लक्ष
जामखेड तालुक्यात एकेकाळी मोठ्या प्रमाणावर घेतली जाणारी सूर्यफूल आणि करडई ही तेलवर्गीय पिके आता जवळपास हद्दपार झाली आहेत. मात्र गवळवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर थोरात यांनी आवर्जून केलेल्या सूर्यफुलाच्या लागवडीने परिसराचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांच्या शेतातील पिवळ्याधमक सूर्यफुलांची फुले पाहण्यासाठी तसेच त्यांच्यासोबत छायाचित्रे व सेल्फी काढण्यासाठी महिलांसह नागरिकांची गर्दी होत असल्याने थोरात यांचे शेत सध्या परिसरातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे.
जामखेड तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ५९ हजार ७३१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामध्ये बाजरी ३६३ हेक्टर, सोयाबीन ३० हजार १६ हेक्टर, तूर १० हजार १६५ हेक्टर, उडीद ११ हजार ७३४ हेक्टर, मका २ हजार ३५२ हेक्टर आणि मूग ८७२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. मात्र सूर्यफूल आणि करडई या तेलवर्गीय पिकांचे क्षेत्र अत्यल्प राहिले असून, ही पिके तालुक्यातून जवळपास हद्दपार झाल्याचे चित्र आहे.
बदलते हवामान, उत्पादनातील चढ-उतार, वाढता उत्पादन खर्च आणि अपेक्षित बाजारभाव न मिळणे, यामुळे शेतकऱ्यांनी सूर्यफुलाच्या लागवडीकडे पाठ फिरवली आहे. त्याचबरोबर यंदा पावसाला झालेला उशीर आणि विविध नैसर्गिक अडचणींमुळे उडीद पिकाच्या पेरणीवरही परिणाम झाला आहे.
सोयाबीन, तूर, उडीद, मका यांसह ऊस, भाजीपाला आणि विविध फळपिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. दरम्यान, ज्ञानेश्वर थोरात यांनी यंदा थोड्या क्षेत्रावर सूर्यफुलाची लागवड केली. त्यातील काही रोपे जोमाने वाढून फुलोऱ्यात आली असून, शेतातील उमललेल्या सूर्यफुलांनी ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सूर्यफुलाचे क्षेत्र कमी होत असताना या फुलांनी शेताला वेगळी शोभा तर दिलीच, पण नागरिकांसाठी अनोखा ‘सेल्फी पॉईंट’ही निर्माण केला आहे. उडीद पिकावरही विविध संकटे याबाबत जामखेड तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले यांनी सांगितले की, “सूर्यफूल व करडई ही पिके शेतकरी घेत नाहीत.
उडीद पिकाची पेरणी यंदा उशिरा झालेल्या पावसामुळे कमी झाली आहे. तसेच खोडमाशीचा प्रादुर्भाव, बाजारातील कमी भाव आणि नैसर्गिक वातावरणातील बदल यामुळे उडीद उत्पादकांची संख्याही कमी झाली आहे.” तेलवर्गीय पिकांना प्रोत्साहनाची गरज सूर्यफूल व करडईसारख्या तेलवर्गीय पिकांचे क्षेत्र पुन्हा वाढविण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण, पीक व्यवस्थापन आणि बाजारपेठेबाबत मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
उत्पादनाला योग्य बाजारभाव आणि शाश्वत उत्पन्नाची हमी मिळाल्यास शेतकरी पुन्हा या पिकांकडे वळू शकतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.