Monday, August 10, 2026
Home ताज्या बातम्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५१ व्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त जामखेडला संगीतमय चरित्र कथेचे आयोजन...

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५१ व्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त जामखेडला संगीतमय चरित्र कथेचे आयोजन श्रीनागेश्वर सप्ताहास बुधवारी प्रारंभ; १७ ऑगस्टला भव्य पालखी सोहळा, विविध कीर्तनकारांची मांदियाळी

0
2
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५१ व्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त जामखेडला संगीतमय चरित्र कथेचे आयोजन   श्रीनागेश्वर सप्ताहास बुधवारी प्रारंभ; १७ ऑगस्टला भव्य पालखी सोहळा, विविध कीर्तनकारांची मांदियाळी

जामखेड न्युज – – – – – – 

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५१ व्या जन्मोत्सवी वर्षानिमित्त जामखेडला संगीतमय चरित्र कथेचे आयोजन

श्रीनागेश्वर सप्ताहास बुधवारी प्रारंभ; १७ ऑगस्टला भव्य पालखी सोहळा, विविध कीर्तनकारांची मांदियाळी

जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त शहरात अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५१ व्या जन्मोत्सवी वर्षाचे औचित्य साधून यंदा ‘संत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्र कथा’ हा विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्रीक्षेत्र तेर (गोरोबा काकांचे) येथील सकल संत चरित्र व श्रीराम कथा प्रवक्ते ह.भ.प. श्री. दीपकजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून सात दिवस ही संगीतमय चरित्र कथा भाविकांना श्रवण करण्याचा लाभ मिळणार आहे.

श्रीनागेश्वर सप्ताहाचा शुभारंभ बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता विणापूजनाने होणार आहे. त्यानंतर दुपारी ३ ते ४.३० या वेळेत अॅड. महारुद्र महाराज नागरगोजे यांचे कीर्तन होईल. सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत संत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्र कथेस प्रारंभ होणार आहे.

सप्ताहादरम्यान दररोज विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. गुरुवारी बाळासाहेब महाराज गाडे, शुक्रवारी रामचंद्र महाराज शिंदे, शनिवारी राजेंद्र महाराज म्हेत्रे, रविवारी संतोष महाराज बांगर, सोमवारी दादासाहेब महाराज सातपुते आणि मंगळवारी विवेकानंद महाराज मंजरतकर यांची कीर्तने होणार आहेत.

यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला श्रीनागेश्वर पालखी सोहळा सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या पालखी सोहळ्यास परिसरातील हजारो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत मालेगाव येथील चेतन महाराज बोरसे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर महाप्रसादाने अखंड हरिनाम सप्ताह व संपूर्ण धार्मिक उत्सवाची सांगता होईल.
असा आहे दैनंदिन कार्यक्रम
सप्ताहादरम्यान पहाटे काकडा, सकाळी ८.३० ते १० या वेळेत श्री शिवलीलामृत पारायण, सकाळी १० ते १२ गाथा भजन, दुपारी ३ ते ४.३० कीर्तन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ आणि त्यानंतर दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ संत ज्ञानेश्वर माऊली संगीतमय चरित्र कथा असा कार्यक्रम राहणार आहे.

कथा व कार्यक्रमानंतर भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त आयोजित या धार्मिक व आध्यात्मिक सोहळ्यामुळे जामखेड शहरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रातून भक्तांना आध्यात्मिक विचार, संस्कार आणि भक्तीचा संदेश मिळणार आहे.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीनागेश्वर पालखी सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह व श्रीनागेश्वर सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!