Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या आक्रमक शिवसेना ‘आदित्य स्टाईल’ने कात टाकतेय!

आक्रमक शिवसेना ‘आदित्य स्टाईल’ने कात टाकतेय!

0
241
जामखेड न्युज – – – 
 केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे  कट्टर विरोधक असलेले नारायण राणे  सातत्याने शिवसेनेवर गरळ ओकत असतानाही शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी केवळ इशारा देऊन राणे यांच्याकडे दुर्लक्ष करणे हा शिवसेनेचा अंदाज निराळा आहे. आगामी मुंबई महानगरपालिकेची  सूत्रे भाजपने नारायण राणे यांच्या हाती सोपवली त्याचप्रमाणे शिवसेनेने पालिका निवडणुकीची कमान वन आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे  यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे त्यांनी ‘आरे ला कारे’ने उत्तर न देता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीला शांत डोक्याने ‘आदित्य स्टाईल’मध्ये सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष असा प्रवास केलेल्या आणि आता भाजपमध्ये स्थिरावलेल्या राजकारणातील मुरब्बी नारायण राणे यांच्याविरुद्ध सक्रिय राजकारणात अलीकडेच पदार्पण केलेल्या आणि पहिल्यांदाच आमदार झालेल्या आदित्य ठाकरे यांचा हा सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. आक्रमक आणि अनुभवी राणे यांच्याकडे शिवसेनेने काल शिताफीने दुर्लक्ष करत राणे यांना मोठे महत्त्व मिळण्याची संधी आदित्य ठाकरे यांनी दिली नाही. राणे यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतच गाजलेली असली तरी आता मात्र ते शिवसेनेवर तुटून पडले आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या कारभारापासून थेट ‘मातोश्री’ बंगल्यापर्यंत राणे पोहोचले आहेत. तरीही शिवसेना ‘स्टाईल’प्रमाणे यावर कोणतीही प्रतिक्रिया उमटलेली नाही. किंबहुना यावर कोणीही प्रतिक्रियाच व्यक्त न करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. इतकेच काय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची दखलही न घेता त्यांच्याबाबतच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्यास नकार दिला.शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर नारायण राणे यांनी येऊ नये असा इशारा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिला होता. त्यांचीच री ओढत आमदार सदा सरवणकर यांनी देखील कुणीही येऊन बाळासाहेबांचे दर्शन घेतील आणि आम्ही पाहत बसणार का?, असा संताप व्यक्त केला होता. शिवसेनेच्या शाखांमधून निरोपही पोहोचले होते. मात्र त्याचवेळी रात्री उशिरा कोणीही शिवसैनिक रस्त्यावर उतरणार नसल्याचा आदेश ‘मातोश्री’वरुन पोहोचला. या प्रसंगाला रस्त्यावर उतरून उत्तर द्यायचे नाही, योग्य वेळ आली की उत्तर दिले जाईल असा निर्णय आदित्य ठाकरे यांनी घेतला.
शिवसैनिकांना सबुरीचा संदेशसत्तेत असलेल्या शिवसेनेनेच कायदा सुव्यवस्था हातात घेणे भाजपच्या पथ्यावरच पडणार असल्याने ठाकरे पिता-पुत्रांनी राणे यांना रस्त्यावर उतरून उत्तर द्यायचे नाही, असा निर्णय घेतला. तरीही अनेक शिवसैनिक शाखांमध्ये येऊन याबाबत नाराजी व्यक्त करत होते. निदान राणे यांच्या रॅलीला काळे झेंडे तरी दाखवूया, असा पर्यायही काही जणांनी सुचवला, मात्र त्यालाही ‘मातोश्री’वरुन परवानगी मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!