जामखेड न्युज – – – – –
नान्नज यात्रेत डीजे बंद केल्याच्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला; एकजण गंभीर जखमी

जामखेड तालुक्यातील नान्नज येथे यात्रोत्सवादरम्यान डीजे बंद केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एक जणांवर कोयता, लोखंडी रॉड, काठ्या, दगड व विटांनी जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. २७ जुलै) रात्री सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात इस्माईल (उर्फ बाबा) मेहमुद शेख (वय ३७, रा. पेठ गल्ली, नान्नज, ता. जामखेड) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जामखेड येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

फिर्यादी इस्माईल (उर्फ पै. बाबा) शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, नान्नज येथे यात्रोत्सव सुरू असून गावात विविध ठिकाणी नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नान्नज बाजारतळ येथेही व्यापारी व गावकऱ्यांच्या सहकार्याने नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महेंद्र साळवे यांचा डीजे लावण्यात आला होता.
रात्री सुमारे १०.१५ वाजता पोलिसांनी नियमानुसार कार्यक्रम बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर डीजे बंद करण्यात आला. पोलिस इतर कार्यक्रम बंद करण्यासाठी निघून गेल्यानंतर फीर्यादी इस्माईल शेख हे डीजे चालकाला तेथून निघण्यास सांगत होते. त्याचवेळी त्यांचे ओळखीचे लक्ष्मण उर्फ पिऱ्या बबन काळे (रा. आरोळेवस्ती, जामखेड), अनुराग उर्फ सोनु उमेश डाडर आणि त्यांच्यासोबत आलेले तीन ते चार अनोळखी इसम तेथे आले. त्यांनी “डीजे पुन्हा सुरू करा” अशी मागणी करत अरेरावी सुरू केली.
यानंतर इस्माईल शेख यांनी पोलिसांनीच डीजे बंद केल्याचे सांगितल्यानंतर आरोपी संतप्त झाले. त्यांनी फीर्यादी इस्माईल शेख यांना शिवीगाळ करत दगड, विटा, कोयता, काठ्या व लोखंडी रॉड याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी इस्माईल शेख व त्यांचा भाचा आझम इम्रान पठाण यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.



