ध्येय मोठे ठेवा, नियोजनबद्ध मेहनत करा; यश तुमच्या पावलांशी येईल – जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यवान डोके दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग विद्यालयात अमृत महोत्सवानिमित्त उच्चपदस्थ माजी विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांशी हितगुज
ध्येय मोठे ठेवा, नियोजनबद्ध मेहनत करा; यश तुमच्या पावलांशी येईल – जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यवान डोके
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग विद्यालयात अमृत महोत्सवानिमित्त उच्चपदस्थ माजी विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांशी हितगुज
दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित उच्चपदस्थ माजी विद्यार्थी मनोगत या विशेष कार्यक्रमात जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विद्यालयाचे माजी विद्यार्थी सत्यवान डोके यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत यशस्वी जीवनासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाच्या वतीने न्यायाधीश सत्यवान डोके यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास माजी प्राचार्य अनंता खेत्रे, माजी विद्यार्थी नासीर पठाण, प्राचार्य बी. ए. पारखे, स्वाती देशमुख, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना न्यायाधीश सत्यवान डोके म्हणाले, “आम्हाला ऐकण्याची सवय असते. न्यायाधीश म्हणून आम्ही दररोज आठ तास लोकांचे म्हणणे ऐकण्याचे काम करतो. मी स्वतः एका शिक्षकांच्या आणि एकाच वर्गाच्या छोट्या शाळेत शिक्षण घेतले. सुरुवातीला पाच वर्षे वकिली केली. त्यानंतर लग्न झाल्यावर एमपीएससी परीक्षा दिली आणि त्यातून पुढील वाटचाल घडली. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी कोणतेही वय अडथळा नसते. योग्य ध्येय, नियोजन, जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही यश मिळवता येते.”
ते पुढे म्हणाले, “कोणतीही गोष्ट अवघड नसते. मोठे ध्येय ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. आज मोबाईलचा अतिवापर विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम करत आहे. अभ्यास, वाचन आणि चिंतन यांना प्राधान्य दिल्यास स्मरणशक्ती वाढते. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्पर्धेला घाबरू नका. प्रत्येक विद्यार्थ्याकडे काही ना काही वेगळे कौशल्य असते. त्या कौशल्याला योग्य दिशा दिली तर यश निश्चित मिळते.”
प्राचार्य बी. ए. पारखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “जीवनात दिशा निश्चित करून सातत्याने प्रयत्न केले तर यश निश्चित मिळते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून परिश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे.”
संस्थेचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, उपाध्यक्ष दिलीप गुगळे, सहसचिव डॉ. सुनील कटारिया, खजिनदार शरद देशमुख, माजी सचिव शशिकांत देशमुख तसेच माजी खजिनदार राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य बी. ए. पारखे, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट, पोपट जगदाळे, नरेंद्र डहाळे, राघवेंद्र धनलगडे, विशाल पोले, किशोर कुलकर्णी, रोहित घोडस्वार, उमाकांत कुलकर्णी, मुकुंद राऊत, हनुमंत वराट, कैलास वराट, स्वप्निल जाधव, बापू जरे, विजय क्षीरसागर, बाबासाहेब समुद्र, गणेश नेटके, साई भोसले, स्वप्नाली घाडगे, आर. एस. कारंडे, एस. बी. हंगे, एम. जे. जाधव, एल. एम. सोळंकी, एस. बी. दराडे, एस. वाय. घायतडक, एस. डी. जगदाळे, पी. बी. भालेराव, एस. व्ही. भोंडवे, व्ही. एस. अल्हाट, प्रियंका सुपेकर, लंघे (पी.टी.) यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक सुदाम वराट यांनी केले, तर उपस्थितांचे आभार उपमुख्याध्यापक अनिल देडे यांनी मानले. विद्यार्थ्यांनी न्यायाधीश सत्यवान डोके यांच्या प्रेरणादायी अनुभवांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.