जुनी पेन्शन योजना शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची; तिच्यासाठी मी सातत्याने लढत आहे – आमदार किशोर दराडे जामखेडमध्ये माध्यमिक शिक्षक-मुख्याध्यापक सहविचार सभा; शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा
जुनी पेन्शन योजना शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची; तिच्यासाठी मी सातत्याने लढत आहे – आमदार किशोर दराडे
जामखेडमध्ये माध्यमिक शिक्षक-मुख्याध्यापक सहविचार सभा; शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा
जामखेड तालुक्यातील माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात पार पडली. शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी जुनी पेन्शन योजना, शिक्षक भरती, टप्पा अनुदान, तुकडी वाढ आदी महत्त्वाच्या विषयांवर शिक्षकांनी आपली मते मांडली.
सभेच्या प्रारंभी माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट यांनी शिक्षकांच्या वतीने विविध मागण्या मांडल्या. नव्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिक्त पदांवरील शिक्षक भरती तातडीने करावी, ४० विद्यार्थ्यांची तुकडी मंजूर करावी तसेच टप्पा अनुदान लवकर मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी प्राचार्य बी. ए. पारखे यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या काल्पनिक वेतनवाढीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. या विषयावर अनेक कर्मचारी न्यायालयात जाण्याच्या तयारीत असून शासनाकडे हा प्रश्न प्रभावीपणे मांडावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कला शिक्षक मुकुंद राऊत यांनी कला शिक्षकाच्या अडचणी सांगितल्या
मार्गदर्शन करताना आमदार किशोर दराडे म्हणाले, “जुनी पेन्शन योजना ही शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ही योजना लागू व्हावी यासाठी मी सातत्याने लढत असून, उच्च न्यायालयातही स्वतः वकिलामार्फत बाजू मांडत आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभर दरबार घेत असून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.”
ते पुढे म्हणाले की, जामखेड तालुक्यातील पंधरा शाळांना प्रोजेक्टर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उर्वरित शाळांनाही लवकरात लवकर देण्यात येतील पुढील महिन्यापासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार असून, विशेषतः क्रीडा शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या हितासाठी भविष्यातही सातत्याने काम करत राहणार असून, प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या सहविचार सभेला मुख्याध्यापक संजय वराट, बी. ए. पारखे, दत्ता काळे, दशरथ कोपनर, भरत लहाने, दत्तात्रय राजमाने, उपमुख्याध्यापक अनिल देडे, जाकीर शेख, सोमनाथ राजुडे, वैभव सांगळे, सतीश डुचे, विशाल पोले, कैलास वराट, मयुर भोसले, सुनिल घाडगे, हनुमंत वराट, साई भोसले, वंदना आल्हाट, संगिता दराडे, स्वप्नाली घाडगे, घायतडक मॅडम, प्रियंका सुपेकर यांच्यासह ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याध्यापक अनिल देडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य आप्पा शिरसाट यांनी मानले. शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याने सभेबद्दल उपस्थित शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.