बांधकामाधीन पुलाच्या खड्ड्यात मोटारसायकल कोसळून जामखेडच्या तरुणाचा मृत्यू
अंधारात पुलाचा अंदाज न आल्याने भीषण अपघात; सुरक्षा उपायांवर नागरिकांचा सवाल
जामखेड–माहीजळगाव महामार्गावरील भातोडी (ता. आष्टी, जि. बीड) येथील नदीवरील बांधकामाधीन पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात जामखेड येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. पहाटेच्या अंधारात सुरू असलेल्या पुलाच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्याची मोटारसायकल थेट पुलाखाली कोसळली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बांधकामस्थळी असलेल्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड–माहीजळगाव महामार्गावरील भातोडी फाटा ते हरिनारायण आष्टा या रस्त्याचे काम सुरू असून भातोडी गावाजवळ नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. मतेवाडी (ता. जामखेड) येथील रहिवासी तथा सध्या पोकळे वस्ती, जामखेड येथे वास्तव्यास असलेले बालाजी विलास पागिरे हे पहाटे हरिनारायण आष्टा येथून मोटारसायकलवरून जामखेडकडे येत होते. भातोडी येथील अपूर्ण पुलाजवळ पोहोचताच अंधारामुळे पुलाच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने त्यांची मोटारसायकल थेट पुलाखाली कोसळली. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पहाटे ग्रामस्थांची ये-जा सुरू झाल्यानंतर पुलाखाली मोटारसायकलसह एक तरुण पडल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी मृत तरुणाच्या मोबाईलवर जामखेड येथील अवधूत हॉटेलच्या मालकाचा फोन आला. ग्रामस्थांनी फोन उचलून अपघाताची माहिती दिल्यानंतर हॉटेलचे मालक तातडीने घटनास्थळी पोहोचले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेला तसेच आष्टी पोलीस ठाण्याला कळविले. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून बालाजी पागिरे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असून आष्टी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
मयत बालाजी पागिरे हे जामखेड येथील अवधूत हॉटेलमध्ये वेटर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, बांधकाम सुरू असलेल्या पुलाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात इशारा फलक, बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था होती का, याबाबत नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दुर्घटनेनंतर अशा बांधकामस्थळांवर आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.