जामखेड न्युज – – – – –
जामखेडमध्ये संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण भक्तिमय वातावरणात संपन्न; हजारो वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जामखेड शहरालगत असलेल्या जमादारवाडी येथील संत वामनभाऊ गडावर गुरुवारी (दि. 16) दुपारी संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचे पहिले गोल रिंगण अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.टाळ-मृदंग, वीणेच्या सुरावटी, हरिनामाचा अखंड गजर आणि “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल”, “गहिनीनाथ महाराज की जय”, “संत वामनभाऊ महाराज की जय” या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

वारकरी संप्रदायाचे मूळ उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या पवित्र स्थळावरून दरवर्षी निघणाऱ्या संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्याला वारकरी संप्रदायात मानाचे स्थान असून, यंदाही गडाचे मठाधिपती ह.भ.प. महंत विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथून पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाली.

गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी आणि मातकुळी असा प्रवास करत पालखी गुरुवारी सकाळी जामखेड तालुक्यातील जांबवाडी येथे दाखल झाली. त्यानंतर जामखेड शहरात प्रवेश होताच तपनेश्वर मंदिर परिसरात श्री नागेश्वर भजनी मंडळाने टाळ-मृदंग आणि वीणेच्या साथीने हरिनामाचा गजर करत पालखीचे जल्लोषात स्वागत केले.






