जामखेड न्युज – – – – – –
पंढरीची वारी ही सामाजिक ऐक्याची शाळा – सभापती प्रा. राम शिंदे
खर्ड्यात विठ्ठलमय वातावरण राम हवेलीत पादुकांचे दर्शन
“पंढरीची वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती सामाजिक ऐक्य, साधेपणा, संस्कार आणि नैतिक मूल्यांची जपणूक करणारी महाराष्ट्राची महान परंपरा आहे. या वारीमुळे जाती-पंथ, लहान-मोठा हा भेद विसरून समाजात एकात्मतेची भावना अधिक दृढ होते,” असा विश्वास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.

श्री क्षेत्र पैठण येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या संत शिरोमणी एकनाथ महाराज पालखीचे खर्डा येथे काल संध्याकाळी आगमन झाले. पालखीचे गावातील नागरिकांनी ढोल-ताशा आणि भगव्या पताकांसह उत्साहात स्वागत केले.

राम हवेलीत भावपूर्ण दर्शन
आज सकाळी राम हवेली मंदिर, मेन रोड, खर्डा येथे सभापती प्रा. राम शिंदे यांनी पालखीच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले आणि राज्यातील शेतकरी, महिला व सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

या प्रसंगी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते श्री क्षेत्र पैठण येथील एकनाथ महाराज पालखीचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. रघुनाथबुवा नारायणबुवा गोसावी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.





