ल. ना. होशिंग उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी प्रवेशोत्सव उत्साहात; नव्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
ल. ना. होशिंग ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना अनुभवी व गुणवंत प्राध्यापकांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यश मिळविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक आहेत. अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयात मनःपूर्वक स्वागत आहे,” असे प्राचार्य बी. ए. पारखे यांनी सांगितले.
ल. ना. होशिंग उच्च माध्यमिक विद्यालयात सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अकरावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संस्थेचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, सचिव अरुणशेठ चिंतामणी, माजी सचिव शशिकांत देशमुख, उपाध्यक्ष दिलीप गुगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे विद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी बोलताना प्राचार्य बी. ए. पारखे यांनी विद्यालयाच्या यशस्वी परंपरेचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. “अमृत महोत्सवी वर्षातील अकरावीची बॅच ही भाग्यवान बॅच आहे. विद्यालयाला तालुक्यातील पहिले ‘अ प्लस’ मानांकन मिळाले असून अनुभवी व गुणवंत प्राध्यापकांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा, खेळ व परीक्षांबाबत मार्गदर्शन करताना ‘नीट’ प्रवेश प्रक्रियेत दहावी-बारावीच्या गुणवत्तेचे महत्त्व वाढत असून पन्नास टक्के नीट गुण व पन्नास टक्के बारावीचे गुण असे सूत्र लागू राहणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. त्यामुळे बारावीच्या अभ्यासाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
मुख्याध्यापक भरत लहाने यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, ध्येय आणि मेहनतीचे महत्त्व पटवून दिले. “गुरूचा आदर करा, आयुष्यात स्पष्ट ध्येय निश्चित करा आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवा. चांगल्या भवितव्यासाठी पाठांतराबरोबरच नियमित अभ्यास आवश्यक आहे. शिस्त अंगी बाणवली तर त्याचा आयुष्यभर फायदा होतो,” असे ते म्हणाले.
प्रा. सतीश डुचे यांनी अकरावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. “अकरावी म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात आहे. आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे शिक्षण घ्या. त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात विद्यार्थी प्रतिनिधी शिफा शेख व आकांक्षा धनवडे यांनी मनोगत व्यक्त करत विद्यालयाविषयीच्या भावना मांडल्या.
पालक प्रतिनिधी संजय वारभोग यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना, “पालकांना अभिमान वाटेल असे शिक्षण घ्या, स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न करा आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवा,” असा संदेश दिला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य युवराज भोसले यांनी करताना सांगितले की, विद्यालयाची शिस्त, दर्जेदार शिक्षण, अनुभवी शिक्षकवृंद, तसेच ‘प्रवेश बंद’चा फलक लावावा लागेल इतकी दरवर्षी होणारी प्रवेशासाठीची मोठी गर्दी याचाही उल्लेख करण्यात आला. विद्यालयातील अनेक प्राध्यापकांनी एकही दिवस रजा न घेता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने कार्य केल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास प्राचार्य बी. ए. पारखे, मुख्याध्यापक दत्तात्रय राजमाने, मुख्याध्यापक भरत लहाने, उपप्राचार्य युवराज भोसले, उपमुख्याध्यापक अनिल देडे, पर्यवेक्षक सुदाम वराट, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब धनवडे, संजय वारभोग, संजय राऊत, जाधव यांच्यासह सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद धुमाळ यांनी केले, तर प्रा. संभाजी शेटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि पालकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे प्रवेशोत्सव संस्मरणीय ठरला.