जामखेड न्युज – – – – –
अ.नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठराव प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याचे सहकार विभागाचे निर्देश
अ. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रतिनिधी निवड व ठराव प्रक्रियेसंदर्भात सावरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जामखेड यांनी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.

संस्थेच्या संचालक श्रीमती सविता सुरेश सपकाळ तसेच बाबासाहेब मारुती थोरात व इतर सदस्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत सहाय्यक निबंधक कार्यालयाने संबंधित सचिवांना कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पत्रात नमूद केल्यानुसार, संस्थेच्या प्रतिनिधी निवडीसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेचा अजेंडा नियमानुसार सर्व संचालकांना वेळेत हातबटवडा आरपीएडी (RPAD) अथवा व्हॉट्सअॅपद्वारे पोहोचविणे बंधनकारक आहे. तसेच आवश्यकतेनुसार सभेचे व्हिडिओ चित्रीकरण करून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

तक्रारदारांनी सभेच्या अजेंड्याबाबत योग्य माहिती न देणे, प्रक्रिया घाईघाईने राबविणे तसेच पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला होता. या तक्रारींची नोंद घेत सहकार विभागाने संबंधित सचिवांकडून खुलासा मागवून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, संबंधित सचिवांनी सभेची नोटीस सर्व संचालकांना देण्यात आल्याचा दावा केला असला, तरी प्राप्त तक्रारी व उपलब्ध कागदपत्रांचा विचार करता पारदर्शक प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी सहकार विभागाने पुढील कार्यवाहीबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांनी जारी केलेल्या पत्रानुसार, संस्थेची प्रतिनिधी ठराव सभा सर्व कायदेशीर अटींचे पालन करून, आवश्यक कालावधीचा अजेंडा देत आणि सर्व संबंधितांना योग्य प्रकारे सूचना करूनच घेण्यात यावी. त्यामुळे निवड प्रक्रियेबाबत भविष्यात कोणताही वाद निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित संस्थेला देण्यात आले आहेत.

चौकट
सावरगाव सोसायटीच्या संचालकांना फसवून सह्या घेऊन ठराव दाखल करण्याचा सचिवाचा डाव उधळला
