Sunday, June 28, 2026
Home ताज्या बातम्या श्री शिवराज्याभिषेक उत्सवाने जामखेड शिवमय; भव्य मिरवणुकीने वेधले जामखेड करांचे लक्ष  रक्तदान,...

श्री शिवराज्याभिषेक उत्सवाने जामखेड शिवमय; भव्य मिरवणुकीने वेधले जामखेड करांचे लक्ष  रक्तदान, कीर्तन, पोवाडे, जलाभिषेक व ऐतिहासिक मिरवणुकीने निर्माण केली जामखेडची नवी परंपरा

0
2

जामखेड न्युज – – – – 

श्री शिवराज्याभिषेक उत्सवाने जामखेड शिवमय; भव्य मिरवणुकीने वेधले जामखेड करांचे लक्ष 

रक्तदान, कीर्तन, पोवाडे, जलाभिषेक व ऐतिहासिक मिरवणुकीने निर्माण केली जामखेडची नवी परंपरा

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, अर्थात हिंदवी स्वराज्य दिनानिमित्त जामखेड येथे श्री शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने दि. २३ ते २७ जून २०२६ या कालावधीत आयोजित श्री शिवराज्याभिषेक उत्सव सोहळा उत्साहात व शिवमय वातावरणात संपन्न झाला. धार्मिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या मालिकेने जामखेड नगरी पाच दिवस अक्षरशः शिवभक्तीत न्हाऊन निघाली.

पाच दिवसीय कीर्तन-पोवाड्यांचा भव्य कार्यक्रम उत्सवाची सुरुवात दि. २३ जून रोजी विनोदसम्राट ह भ.प. ज्ञानेश्वर महाराज तांबे, नेवासा यांच्या विनोदी शैलीतील कीर्तनाने झाली. दि २४ जून रोजी भागवताचार्य ह.भ.प. समाधान महाराज शर्मा, केज यांनी प्रखर वाणीने भागवत कीर्तनातून प्रबोधन केले. दि. २५ जून रोजी गौरव महाराष्ट्राचा शिवशाहीर पृथ्वीराज माळी, सांगली यांच्या शौर्यगाथा व पोवाड्यांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले.

दि. २६ जून हा दिवस सामाजिक बांधिलकीचा ठरला. सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित भव्य रक्तदान शिबिरात १७२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य बजावले. सायंकाळी कीर्तनचंद्रिका ह.भ.प. रोहिणीताई परांजपे-माने, पुणे यांनी “राजमाता जिजाऊ – महिला सक्षमीकरण”या विषयावर प्रबोधनात्मक कीर्तन केले. ‘मुलगी वाचवा, समाजात सकारात्मक बदल घडवा’ हा संदेश त्यांनी दिला. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

दररोजच्या कार्यक्रमात शिवप्रेमी व माता-भगिनींची संख्या उल्लेखनीय होती. पावसाची शक्यता लक्षात घेऊन संपूर्ण वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला होता. शिव महाप्रसादाचे नियोजनही उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले.

तालुक्याचा मान वाढवणाऱ्यांचा गौरव :
उत्सव समितीच्या वतीने जामखेड तालुक्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, सैन्य व पोलीस दलात भरती झालेले युवक, शासकीय सेवेत रुजू झालेले अधिकारी व आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा विशेष सन्मान करण्यात आला.

शिवराज्याभिषेक दिनी शिवमय पहाट व ऐतिहासिक मिरवणूक :
दि. २७ जून, शनिवारी पहाटे ५ वाजता सप्तनद्या, गडकोट व तीर्थक्षेत्रांहून आणलेल्या पवित्र जलाने व वेदमंत्रांच्या घोषात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर जलाभिषेक करण्यात आला. पहाटेच्या या सोहळ्यास जामखेडकर शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.


दुपारी छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड येथून श्री गणेशाच्या आरतीने भव्य दिव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत अश्वपथक, ध्वज पथक, हलगी पथक, धर्मयोद्धा ढोल पथक, राजस्थानातील वाद्यपथक, लाठी-काठी व शस्त्र पथक, देव मामलेदार बँजो पथक, अहिल्यानगर येथील रोप मल्लखांब मुलींचे पथक यांनी आपल्या उत्कृष्ट कला सादर करून जामखेडकरांची मने जिंकली.

भव्य देखाव्यांनी वेधले लक्ष
हत्तीवरील छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती, मारुती बैठकीतील हनुमान मूर्ती, धर्मवीर संभाजी महाराजांची आकर्षक मूर्ती, मराठा आरमाराचे जहाज व मावळे, छत्रपती शिवाजी महाराज व बाल शंभूराजे यांची अश्वारूढ मूर्ती, हुबेहूब ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा देखावा, ‘परस्त्री मातेसमान’ हा संदेश देणारा देखावा. येरमाळा येथील श्री येडेश्वरी देवीची भव्य प्रतिकृती यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. बीड कॉर्नर येथे भव्य सामूहिक आरती करण्यात आली.

धर्मवीर संभाजी महाराजांचा जिवंत देखावा हे मिरवणुकीचे सर्वात अंगावर शहारे आणणारे सादरीकरण ठरले. या नाट्यमय सादरीकरणाने इतिहास काळ डोळ्यासमोर उभा राहिला. हजारोंच्या संख्येने जामखेडकर या सोहळ्याचे साक्षीदार झाले.

शिस्तबद्ध नियोजनाचे कौतुक :
पोलीस प्रशासनासोबत शिवप्रेमी मावळ्यांनी वाहतूक व गर्दी नियोजनात उत्कृष्ट कार्य करून प्रशासनाला सहकार्य केले. मिरवणुकीमुळे जामखेड शहरात ऐतिहासिक काळ अवतरल्याचा भास निर्माण झाला होता.

मिरवणुकीचा समारोप
लक्ष्मी चौक येथे मिरवणुकीचा समारोप झाला. यावेळी शिवप्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष पांडुराजे भोसले यांनी जामखेड येथील खर्डा चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती बसवण्याचे आवाहन केले. ‘गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने शिव-शंभू रक्तगटाची पिढी निर्माण करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. समाजाच्या अडचणीच्या काळात आम्ही सदैव मदतीस तत्पर आहोत,’ असे ते म्हणाले. ‘श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे चौदावे वर्ष असून सर्वांनी एकत्र येऊन निस्वार्थ भावनेने कार्य केले. श्री शिवराज्याभिषेक ही आता जामखेडची परंपरा बनली आहे,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले. ‘शिवरायांचे आठवावे रूप’ या घोषणेने सोहळ्याची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!