जामखेड न्युज – – – – – –
जिद्दीला सलाम : पिंपळगाव (आळवा) च्या दत्ता नरके यांची MPSC मधून ‘महसूल सहाय्यक’ पदी निवड
वडिलांचे छत्र हरपले, आईच्या घामातून फुलले यश

पिंपळगाव (आळवा), ता. जामखेड: जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या बळावर यश खेचून आणता येते, हे पिंपळगाव (आळवा) येथील दत्ता बाळासाहेब नरके या युवकाने दाखवून दिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या गट-क संवर्गातील महसूल सहाय्यक पदाच्या परीक्षेत दत्ताची निवड झाली असून, त्याच्या या घवघवीत यशाने गावासह संपूर्ण जामखेड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वडिलांचे छत्र हरपले, आईच्या घामातून फुलले यश
दत्ताचा संघर्ष हा काट्यांनी भरलेला होता. लहानपणीच वडिलांचे निधन झाले. घरची जबाबदारी आई शोभा नरके यांच्या खांद्यावर आली. मुलाच्या स्वप्नांसाठी त्यांनी शेतात मोलमजुरी करून, ऊन-पाऊस न पाहता संसाराचा गाडा ओढला. शिक्षणासाठी पै-पै जोडली.

संघर्षातून घडले यशाचे शिखर
दत्ता नरके यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले घरची परिस्थिती अत्यंत बेताची. मात्र आई शोभा नरके यांनी खचून न जाता शेतात ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता काबाडकष्ट केले. मुलाच्या शिक्षणासाठी त्या दिवस-रात्र राबल्या. याच काळात मामा सातपुते सर यांनीही दत्ताला मोलाची साथ दिली. आर्थिक व शैक्षणिक मार्गदर्शन करून त्याला अभ्यासासाठी बळ दिले.

“परीक्षेच्या काळात १४-१५ तास अभ्यास करायचो. आईच्या कष्टाचे चीज करायचेच, हीच जिद्द होती” असे दत्ताने भावूक होऊन सांगितले.
ग्रामीण भागासाठी आदर्श
दत्ताच्या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे. “गावात राहून, कमी साधनांमध्येही MPSC सारखी परीक्षा पास होता येते, हे दत्ताने दाखवून दिले” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.




