जामखेड न्युज – –
सांगली : बैलगाडा शर्यतीला परवानगी नसतानाही बैलगाडा शर्यतीचं आयोजन सांगलीत करण्यात आलं आणि पोलिसांना गुंगारा देत ही शर्यत संपन्न पडल्याचं पहायला मिळालं. सांगली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असताना देखील गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत भरवून दाखवली आहे. गनिमी कावा करत चार वेगवेगळ्या ठिकाणी शर्यतीची तयारी करून प्रत्यक्षात मात्र शर्यत वेगळ्याच ठिकाणी घेतली आणि पोलिसांनाही शर्यतीच्या ठिकाणाचा तपास लागला नाही._
रातोरात तयार केलं मैदान
आटपाटी तालुक्यातील झरे या गावी बैलगाडा शर्यत होणार असल्याचं सांगत गोपीचंद पडळकरांनी सरकारला आव्हान दिलं होतं. ही शर्यत होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज झाले होते. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिसांनी कटेकोट बंदोबस्त तैनात केला होता. शर्यत स्थळावरही पोलीस उपस्थित होते. मात्र, पोलिसांना चकवा देत पडळकरांनी रातोरात दुसऱ्या जागेवर मैदान तयार करत शर्यत भरवली.
पाच किलोमीटरचा बनवला ट्रॅक!
गोपीचंद पडळकरांनी पोलिसांना चकवा देत एका रात्रीत पाच किलोमीटरचा दुसरा ट्रॅक बनवून बैलगाडा शर्यती पार पडल्या. आटपाटी तालुक्यातील निंबवडे- वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान या शर्यती झाल्या. या शर्यतीत पाच ते सहा बैलगाडी चालक आणि मालक सहभागी झाले होते, अशी माहिती समोर येतेय.
पडळकरांवर कारवाई होणार?
दरम्यान, ही शर्यत होऊ नये यासाठी सांगलीतील नऊ गावांत संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली होती. तसेच मोठा पोलीस बंदोबस्तही होता. मात्र, असे असतानाही गोपीचंद पडळकर यांनी गनिमी कावा करत बैलगाडा शर्यत संपन्न करुन दाखवली आहे. त्यामुळे आता पडळकरांनी भरवलेल्या बैलगाडा शर्यतीवर पोलिस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.






