Wednesday, May 13, 2026
Home ताज्या बातम्या लग्नाच्या आमिषाने प्रेमसंबंध; तरुणीच्या आत्महत्येनंतर प्रियकराविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

लग्नाच्या आमिषाने प्रेमसंबंध; तरुणीच्या आत्महत्येनंतर प्रियकराविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

0
2

जामखेड न्युज – – – – – – 

लग्नाच्या आमिषाने प्रेमसंबंध; तरुणीच्या आत्महत्येनंतर प्रियकराविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

 

लग्नाचे आश्वासन देत दोन वर्षे प्रेमसंबंध ठेवून नंतर लग्नास नकार देत जीवे मारण्याची धमकी दिल्याने एका २९ वर्षीय तरुणीने विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच जामखेड येथे उघडकीस आली होती या प्रकरणी मृत तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित प्रियकराविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शबनम दस्तगीर सय्यद (वय २९) या जामखेड येथील रहिवासी असून त्या मागील काही वर्षांपासून परिचारिका म्हणून काम करत होत्या. त्यांचे लग्न २०१३ मध्ये झाले होते. मात्र पतीकडून होणाऱ्या मारहाणीमुळे त्यांनी २०२३ मध्ये घटस्फोट घेतला होता.

त्यानंतर त्या आपल्या दोन मुलांसह आई-वडिलांकडे राहत होत्या.
दरम्यान, शिक्षण घेत असताना त्यांची ओळख अली अब्दुल पठाण (रा. आष्टी, जि. बीड) याच्याशी झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. फिर्यादीनुसार, अली पठाण याने शबनम यांच्याशी लग्न करण्याचे आश्वासन देत दोन वर्षे संबंध ठेवले.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो लग्नास टाळाटाळ करत होता. तसेच लग्नाचा विषय काढल्यास तुझे तुकडे करून फेकून देईल,अशी धमकीही देत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या मानसिक त्रासामुळे शबनम या खचल्या होत्या. दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री त्या जामखेड येथील लोंढे हॉस्पिटलमध्ये ड्युटीसाठी गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांनी हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये विषारी औषध इंजेक्शनद्वारे शरीरात टोचून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शबनम यांच्या आई शायना दस्तगीर सय्यद यांनी जामखेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अली अब्दुल पठाण याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!