जामखेड न्युज ——
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सहायक निबंधक यांच्या कडे
काही पदाधिकारी यांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला का ?

भाजपाच्या ताब्यात असलेल्या व कोट्यवधी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव वाहेद सय्यद नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी जामखेड सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांच्याकडे सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. आता शेतकरी हिताचे निर्णय होतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

काही वर्षांपूर्वी सचिव पदी सहायक निबंधक असताना दोन अडीच वर्षांच्या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार साडेतीन कोटी रुपये नफ्यात आलेली होती. मग हे काम पदाधिकारी व स्थानिक सचिवांना का साध्य होत नाही. सचिव म्हणजे पदाधिकारी यांच्या हाताखालील बाहुले म्हणून काम करणे यामुळेच कदाचित सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सहायक निबंधक यांच्या कडे सोपविण्यात आला आहे अशीच चर्चा सध्या व्यापारी व शेतकरी वर्गात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेड, जि. अहिल्यानगर मासिक सभा दि.३०/०३/२०२६ मधील ठराव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अहिल्यानगर यांचेकडील दि.०१/०४/२०२६ चे पत्र जोडून पणन संचालक, पणन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयाने दि.१६/४/२०२६ च्या पत्रान्वयेमहाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विननियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३५ (अ) मध्ये काहीही अंतर्भुत असले तरी, राज्य शासनास सहकार विभागातील (सहकार अधिकारी श्रेणी दोन) या पदाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाच्या पदावर नसेल अशा कोणत्याही अधिकाऱ्यास कोणत्याही बाजार समितीचा सचिव नियुक्त करता येईल, अशी कायदेशीर तरतूद आहे.
सदर तरतूदीच्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, गट-ब या दर्जाचे अधिकाऱ्याला कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेड, जि. अहिल्यानगर या ठिकाणी सचिव पदाचा अतिरिक्त पदभार देणेबाबत प्रस्ताव अनुषंगीक कागद पत्रांसह या कार्यालयास सादर केला आहे.

उपरोक्त नमूद बाबी विचारात घेता कार्यालयीन कामकाज व प्रशासकीय सोइच्या दृष्टिने सचिव,कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेड, जि. अहिल्यानगर या पदाचा अतिरिक्त पदभार श्री. दिलीप रंगनाथ तिजोरे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, जामखेड, जि. अहिल्यानगर यांचेकडे पुढील आदेश होईपर्यंत सोपविण्यात येत आहे.




