Saturday, May 2, 2026
Home ताज्या बातम्या जामखेडमध्ये चारचाकी पुढे घेण्याच्या वादातून मारहाण; १२-१३ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा...

जामखेडमध्ये चारचाकी पुढे घेण्याच्या वादातून मारहाण; १२-१३ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल, चार दिवसातील दुसरी घटना

0
2

जामखेड न्युज—–

जामखेडमध्ये चारचाकी पुढे घेण्याच्या वादातून मारहाण; १२-१३ जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल, चार दिवसातील दुसरी घटना

जामखेड नगर रोड परिसरात चारचाकी पुढे घेण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर लोखंडी पाईपने हल्ला केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी १२ ते १३ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार दिवसांत याच परिसरात दुसरी मारहाणीची घटना घडली आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, किरण सिताराम आंधळे (वय २६, रा. आंधळेवाडी, ता. आष्टी, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिनांक १ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास नगर रोडवरील गरम पान स्टॉलसमोर ही घटना घडली.फिर्यादी व त्यांचे साथीदार चारचाकी वाहनाने आंधळेवाडी येथे जात असताना समोरील वाहनचालकास गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याने आरोपींना राग आला.

त्यानंतर संबंधित वाहनातील तसेच इतर १२ ते १३ अनोळखी व्यक्तींनी विकास हौसराव आंधळे (वय २९) यांच्यावर लोखंडी पाईपने हल्ला करून गंभीर जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या मारहाणीमध्ये फिर्यादीच्या वाहनाचे नुकसान करण्यात आले असून विकास आंधळे यांचा मोबाईलही फोडण्यात आला आहे. जखमी विकास आंधळे यांना उपचारासाठी जामखेड येथील पन्हाळकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत एकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस तपासात इतर आरोपींची नावे सिद्ध होतील अशी शक्यता आहे.

या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस काँन्स्टेबल शिवाजी कदम करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!