जामखेड पाणीटंचाई, उष्माघात, राष्ट्रीय महामार्ग बाबत तातडीने उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणाबाबत बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना कार्यवाहीचे निर्देश
जामखेड पाणीटंचाई, उष्माघात, राष्ट्रीय महामार्ग बाबत तातडीने उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणाबाबत बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना कार्यवाहीचे निर्देश
कर्जत व जामखेड तालुक्यात उन्हाची वाढती तीव्रता, संभाव्य अवकाळी पाऊस व टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सतर्क राहून पशुधन व नागरिकांना दिलासा द्यावा. प्रलंबित कामे मुदतीत पूर्ण करून पाणी व चारा टंचाईबाबत तातडीने उपाययोजना अमलात आणाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
कर्जत व जामखेड तालुक्यांच्या दौऱ्यात विविध शासकीय कार्यालये व प्रकल्पांना दिलेल्या भेटीप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या दौऱ्यात त्यांच्या समवेत प्रांताधिकारी नितीन पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट व उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. महारुद्र खरपाडे, महावितरणचे प्रदिप कटकधोंड, तहसीलदार धनंजय बांगर, नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, “वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात कक्षात केवळ पंख्यांवर अवलंबून न राहता रुग्णांसाठी तातडीने कुलरची व्यवस्था करण्यात यावी. मागील सहा महिन्यांपासून बंद असलेल्या शस्त्रक्रिया कक्षाची दुरुस्ती करून तो तात्काळ सुरू करण्यात यावा. नैसर्गिक पाण्याचे जलस्रोत, पाण्याची पातळी व पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी सर्व प्रशासकीय विभागांनी संयुक्त कारवाई करावी.”
जामखेड येथे राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणाबाबत बैठक घेऊन त्यांनी संबंधित यंत्रणांना कार्यवाहीचे निर्देश दिले. पंचायत समिती सभागृहात पाणीटंचाईग्रस्त गावांतील सरपंच, ग्रामसेवक व तलाठी यांच्यासोबत बैठक घेऊन मागणीनुसार तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. कर्जत तहसील कार्यालयात प्रशासनातील सर्व विभाग प्रमुखांची टंचाई आढावा बैठक घेत खते, बियाणे व आरोग्य विभागाचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
निमगाव डाकू येथील मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्पाला भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध असून उर्वरित कामे ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. रातंजन येथील लोकसहभागातून तयार केलेल्या शिवरस्त्याची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. टाकळी खांडेश्वरी येथे बांबू शेती प्रकल्पाला भेट दिली व कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती घेतली. दौऱ्यादरम्यान ५० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामाची पाहणी करून कामाची गती वाढविण्याचे त्यांनी निर्देश दिले.
प्रशासकीय समन्वय राखत सर्व अधिकारी, विभाग प्रमुखांनी बैठका व क्षेत्रीय भेटींना स्वतः उपस्थित राहावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
मिरजगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाहणीत माता व बालसंगोपन कार्यक्रमांतर्गत निश्चित प्रसूती उद्दिष्टाच्या तुलनेत प्रसूतीचे प्रमाण कमी असणे ही चिंतेची बाब असून जनजागृतीपर कार्यक्रम राबवून यात सुधारणा करावी. माहेजी येथील प्रस्तावित स्थलांतर प्रक्रियेबाबतही त्यांनी चर्चा केली.
मौजे रत्नापूर तालुका जामखेड येथे मुख्यमंत्री सौर कृषी योजना 2.0 अंतर्गत 33/11 के. व्हि. या कामाची पाहणी तसेच जामखेड येथील गट नंबर 534 476 व 572 मधून जाणारा रस्ता व 531 व 527/3 ला मिळणारा रस्ता हा रस्ता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 अन्वये नवीन रस्ता या कामांची पाहणी केली.