अखेर साकत घाटातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू, हरीभाऊ मुरुमकर यांच्या उपोषणाला यश
रस्त्याची क्षमता नऊ टनाची वाहतूक तीस ते चाळीस टनाची
जामखेड साकत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. रस्त्यावरील व विशेषतः घाटातील खड्ड्यामुळे अनेक वाहने पलटी झालेली होती. अनेकांना अपंगत्व तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. जामखेड सौताडा रस्ता काम सुरू असल्याचे मोठ्या प्रमाणात वाहतूक या रस्त्यावरुन होत आहे. खड्ड्यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्डे बुजवावेत घाटात बँरिकेटर्स व रेडियम लावावे म्हणून हरीभाऊ मुरुमकर हे तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते.
या उपोषणाची दखल घेत बांधकाम विभागाने ठेकेदाराला खड्डे बुजविण्याचे लेखी आदेश दिले होते. तसेच लवकरात लवकर घाटात तुटलेले बँरिकेटर्स लावले जातील व रेडियम लावले जाईल असे लेखी देत उपोषण सोडवले होते.यानुसार आज काम सुरू झाले आहे. मात्र मोठ्या प्रमाणातील वाहतूक व मर्यादेपेक्षा जास्त वजनाच्या गाड्या रोडवर सर्रास दिसतात. यामुळे खड्डे बुजवले तरी परत खड्डे पडण्याची शक्यता आहे.
हरीभाऊ मुरुमकर यांचे उपोषण सोडविण्यासाठी बांधकाम विभागाचे लेखी पत्र घेऊन तहसीलदार मच्छिंद्र पाडळे आले होते यावेळी शहाजी राळेभात, कांतीलाल वराट, कैलास वराट, महादेव वराट, प्रा. दादासाहेब मोहिते, शिवाजी कोल्हे, सदाशिव वराट, अजित वराट उपस्थित होते. उपोषणाला पाठिंबा म्हणून तालुक्यातील व परिसरातील अनेक नेते व पदाधिकारी यांनी हजरी लावली होती.
खड्ड्यामुळे एका महिन्यात ऊसाच्या दहा गाड्या पलटी झाल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खड्ड्यामुळे गाड्या पलटी होत होत्या. आता परत खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे.
सर्व खड्डे बुजविण्याचे काम केले होते पण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने वाहतात त्यामुळे खड्डे बुजवले तरी परत पाडतातच आता परत खड्डे बुजवत आहे. (ठेकेदार महादेव खाडे)
रस्त्यावरील खड्डे पाहता परत बुजविण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्याची वाहतूक क्षमता नऊ टनाची आहे मात्र रस्त्यावर तीस ते चाळीस टनापर्यंत लोडच्या गाड्या सतत वाहतात. यामुळे रस्ता लवकर खराब होत आहे. रस्त्यावर मर्यादेपेक्षा जास्त वाहतूक होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाला पत्र देणार आहे. शशिकांत सुतार – उप अभियंता सार्वजनिक बांधकाम जामखेड
सध्या जामखेड सौताडा रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे ती वाहतूक या मार्गावरून होते. ऊस वाहतूक, अवजड वाहतूक ही मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे रस्ता लवकर खराब होत आहे. यामुळे लवकरात लवकर करमाळा पाटोदा साकत मार्गे रस्ता व्हावा तसेच कल्याण लातूर मार्ग साकत मार्गे करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.