Saturday, January 31, 2026
Home ताज्या बातम्या ‘क्रॅश’ झालेलं राजकारण! संजय गांधी ते अजित पवार; भारतीय नेत्यांचे दुर्दैवी...

‘क्रॅश’ झालेलं राजकारण! संजय गांधी ते अजित पवार; भारतीय नेत्यांचे दुर्दैवी विमान अपघात

0
6

जामखेड न्युज——-

‘क्रॅश’ झालेलं राजकारण!

संजय गांधी ते अजित पवार; भारतीय नेत्यांचे दुर्दैवी विमान अपघात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले आहे. बारामतीमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार चार जाहीर सभांना संबोधित करणार होते. मात्र, बारामती विमानतळाजवळ आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना विमान कोसळले आणि त्याला भीषण आग लागली.

या विमानात त्यांच्यासोबत अन्य 4 लोकही होते. अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे लोट हवेत पसरले होते. या घटनेने संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली असून भारताच्या राजकीय इतिहासातील विमान अपघातांच्या काळ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

संजय गांधी (1980)
भारताच्या इतिहासातील सर्वात चर्चिलेल्या विमान अपघातांपैकी एक म्हणजे संजय गांधी यांचे निधन. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चिरंजीव आणि आणीबाणीच्या काळातील एक शक्तिशाली नेते म्हणून संजय गांधी यांची ओळख होती. 23 जून 1980 रोजी दिल्लीत एका विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे वय अवघे 33 वर्षे होते. सफदरजंग विमानतळाजवळ एका दुचाकी विमानाचे प्रायोगिक उड्डाण करत असताना हा अपघात झाला होता. या घटनेने त्यावेळी देशाला मोठा धक्का दिला होता.

विजय रुपाणी 2025
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा 2025 मध्ये एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर अपघातात मृत्यू झाला. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ते एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळले. या भीषण दुर्घटनेत 241 लोकांचा जीव गेला होता.

माधवराव सिंधिया (2001)
ग्वाल्हेर राजघराण्याचे वारसदार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते माधवराव सिंधिया यांचा 30 सप्टेंबर 2001 रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. एका राजकीय सभेसाठी जात असताना उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात त्यांचे चार्टर्ड विमान कोसळले. या अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता.

वाय. एस. राजशेखर रेड्डी (2009)
अशीच एक दुर्दैवी घटना आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांच्यासोबत घडली. 2 सप्टेंबर 2009 रोजी नल्लामाला टेकड्यांच्या परिसरात त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. मोठ्या शोधमोहिमेनंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे अवशेष सापडले होते.

जीएमसी बालयोगी (2002)
लोकसभेचे माजी सभापती आणि तेलगू देसम पार्टीचे नेते जीएमसी बालयोगी यांचा 3 मार्च 2002 रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते.

दोर्जी खांडू ( 2011)
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोर्जी खांडू यांचे हेलिकॉप्टर भारत-चीन सीमेजवळील दुर्गम भागात कोसळले. 30 एप्रिल 2011 रोजी झालेल्या या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आणि पाच दिवसांच्या शोधमोहिमेनंतर त्यांचे विमान सापडले होते.

ओ. पी. जिंदाल आणि सुरेंद्र सिंह (2005)
31 मार्च 2005 रोजी प्रसिद्ध उद्योगपती आणि हरियाणाचे मंत्री ओ पी जिंदाल आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेंद्र सिंह यांचे उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.

याशिवाय पंजाबचे माजी मुख्यमंत्री गुरनाम सिंग यांचाही 31 मे 1973 रोजी दिल्लीत विमान अपघातात मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!