जामखेड न्युज——-
विज्ञान प्रदर्शनासाठी १कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार -ना.विखे पाटील
जिल्हास्तरीय ५३ वे बाल वैज्ञानिक प्रदर्शन पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये संशोधनात्मक वृती निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावर अधिक प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. विज्ञान प्रदर्शनासाठी अधिकच्या सोयी सुविधा निर्माण करून देतानाच एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

जामखेड येथील नागेश विद्यालय येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान-गणित अध्यापक संघ, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन २०२५-२६ चा पारितोषिक वितरण समारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमास जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, नितीन दिनकर, मनोज कुलकर्णी, विनायक देशमुख शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, गटविकास अधिकारी प्रदीप चव्हाण, नागेश विद्यालयाचे प्राचार्य भगवान मडके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले , विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही.घोकमपट्टीच्या शिक्षणाचे दिवस आता संपले आहेत. विद्यार्थ्यांनी प्रयोग, संशोधन व निरीक्षणावर भर दिला पाहिजे.यासाठी शिक्षकांच्या मानसिकतेत सुध्दा बदल होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आपल्या देशाला डाॅ सी.व्ही.रमन डाॅ होमी भाभा डाॅ.एपीजे अब्दुल कलाम डाॅ एम.एस.स्वामीनाथन् यांच्या सारख्या थोर शास्त्रज्ञांची परंपरा लाभली.प्रत्येकाने आपल्या योगदानातून देशाला बलशाली बनविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत.यासर्व थोर शास्त्रज्ञांचा इतिहास विद्यार्थ्यांच्या पर्यत पोहचविण्यात यंत्रणा कमी पडत असल्याची खंत डाॅ विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आज जगभरात भारतीय शास्त्रज्ञ आपली क्षमता सिद्ध करत आहेत.ब्रम्होस चांद्रयान मोहीम यामाध्यमातून तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून आत्मनिर्भर भारताकडे देशाची वाटचाल सुरू आहे. देशात तसेच जगभरात तंत्रज्ञानात होत असलेले बदल व नवनवीन संशोधनाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी इस्रो, नासा यांसारख्या वैज्ञानिक संस्थांना विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करण्याची सूचना त्यांनी शिक्षण विभागाला केली.
ते पुढे म्हणाले, संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आजच्या घडीला प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विविध क्षेत्रांमध्ये वेगाने वाढत आहे. देश कौशल्य विकास कार्यक्रमात उभारी घेत असून, उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमातून कौशल्याधारित कोर्सेस सुरू करण्यात यावेत. कालानुरूप शैक्षणिक अभ्यासक्रमातील बदलते प्रवाह यासारख्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या बदलत्या युगात अशा जिल्हास्तरीय प्रदर्शनांमधून भावी गुणवंत वैज्ञानिक घडावेत, यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. प्रदर्शन आयोजनासाठी असलेल्या ५ लाख रुपयांच्या निधीत वाढ करून तो १ कोटी रुपयांपर्यंत करण्यात येईल. या माध्यमातून जिल्ह्यातून भविष्यात मोठे शास्त्रज्ञ व संशोधक घडतील, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संध्या गायकवाड म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये गणित व विज्ञान विषयांबाबत आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येक तालुक्यात बाल वैज्ञानिक प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले असून, त्यामधून उत्कृष्ट ठरलेली उपकरणे जिल्हास्तरीय प्रदर्शनात सादर करण्यात आली आहेत. मूल्यांकनानंतर उत्कृष्ट ठरलेल्या २९ उपकरणांचा राज्यस्तरीय प्रदर्शनात समावेश करण्यात येणार आहे.
या बाल वैज्ञानिक प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शाळांमधील विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित, पर्यावरण, आरोग्य, शेती, ऊर्जा, पाणी व्यवस्थापन, डिजिटल तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, संशोधन वृत्तीचे व सामाजिक जाणिवेचे दर्शन घडविणाऱ्या या प्रकल्पांचे मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमात विविध गटांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे व पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास जिल्हा विज्ञान-गणित अध्यापक संघाचे पदाधिकारी, अधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




