सूर्यकांत मोरेंवर फौजदारी कारवाईचे उपसभापती नीलम गोऱ्हेंनी दिले पोलीसांना आदेश मी कार्यकर्त्याच्या पाठिशी ठामपणे उभा राहणार – आमदार रोहित पवार.

0
1449

जामखेड न्युज——

सूर्यकांत मोरेंवर फौजदारी कारवाईचे उपसभापती नीलम गोऱ्हेंनी दिले पोलीसांना आदेश

मी कार्यकर्त्याच्या पाठिशी ठामपणे उभा राहणार – आमदार रोहित पवार.

 

जामखेड नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचार सभेत रोहित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सूर्यकांत मोरे यांनी विधानपरिषदेची रचना, कामकाज आणि सभापतींच्या पदाबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. मोरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहाचा गौरव, परंपरा आणि घटनात्मक पदांचा अपमान झाल्याचा ठपका लावत आ. प्रवीण दरेकर व आ. श्रीकांत भारतीय यांनी विशेष हक्कभंगाचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला सर्वच पक्षांच्या आमदारांनी पाठिंबा देत मोरे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

हक्कभंग प्रस्तावावर सभागृह सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सूर्यकांत मोरे यांच्या भाषणाला “अवमानकारक, दिशाभूल करणारे आणि जनमानसात सभागृहाबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण करणारे” असे संबोधत कठोर कारवाईचे निर्देश दिले. कार्पेटचा लाल रंग दुष्काळाचे प्रतीक आहे, विधानपरिषदेत फक्त ७०-७५ सदस्य बसतात, सभापती कायदेपंडित नाहीत अशा वक्तव्यांमुळे सभागृहाचा आणि सदस्यांचा अपमान झाल्याचे सर्वपक्षीय सहमतीने सांगण्यात आले.

या हक्कभंग प्रस्तावावर निर्णय देताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, विधानपरिषद व सभापतींच्या घटनात्मक भूमिकेवर, सदस्यांच्या कर्तव्यांवर व सभागृहाच्या संरचनेवर अशा प्रकारची टीका करणे ही विशेषाधिकारभंगाची कृती ठरते. जनमानसात विधानपरिषदेबद्दल नकारात्मकता पसरविण्याचा हा प्रयत्न असून सभागृहाचा अवमान करण्याचा हेतू जाणवतो, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. गोऱ्हे यांनी पुढे सांगितले की, अशा प्रकारच्या अवमानकारक विधानांवर फक्त विशेषाधिकारभंगाची शिक्षा पुरेशी ठरणार नाही. “संबंधितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये फौजदारी कारवाई आवश्यक आहे,” असे मत नोंदवत त्यांनी पोलिसांनी तातडीने चौकशी करावी व आवश्यक त्या कायद्यांनुसार पुढील कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश दिले. हे प्रकरण हक्कभंग समितीकडेही पाठविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सभागृहात सर्वपक्षीय सदस्यांनी या वक्तव्याचा निषेध करत सभागृहाचा सन्मान राखण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची मागणी केली. उपसभापतींनीही पक्षीय सीमांच्या पलीकडे जाऊन सदस्यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले आणि विधानपरिषद ही राज्याची गौरवशाली व घटनात्मक संस्था असल्याचा पुनरुच्चार केले.

चौकट
सुर्यकांत मोरे नॉट रिचेबल

जामखेड नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत सुर्यकांत मोरे यांनी विधान परिषदे सभापतींच्या पदाबद्दल केलेल्या अवमानकारक वकतव्याचे पदसाद हिवाळी अधिवेशनात उमटले . विधानपरिषद उपसभापती डॉ . नीलम गोऱ्हे यांनी सुर्यकां मोरे यांच्या भाषणाला अवमानकारक असून हे प्रकरण गंभीर असल्याचे स्पष्ट केले . पोलीसांनी तातडीने कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश दिल्यामुळे सुर्यकांत मोरे यांच्या अडचणी वाढल्या असुन त्यांच्याशी संपर्क केला असता मोरे हे नॉट रिचेबल होते .

चौकट
कारवाई राजकीय आकसापोटी
सभापती प्रा. राम शिंदे यांनी आचारसंहिता लागू असताना पदाचा दुरूपयोग करत कार्यकर्त्यांना भीती दाखवण्यासाठी कारवाई केवळ राजकीय आकसापोटी करण्यात आली आहे. जर सभागृहाचा अवमान झाला असेल तर मी माफी मागतो. पण
मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहणार आहे.

आमदार रोहित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here