… त्यांनी माझ्या राहणीमानावर न बोलता आपल्याला लोक सोडून का जातात व विकासावर बोलावे – विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे
जनतेने भाजपला का मतदान करावे? यादृष्टीने आम्ही जामखेड शहर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित व विकसीत असावे असा जाहीरनामा तयार करून प्रकाशित केला आहे. त्यांनी (आ. रोहीत पवार यांचे नाव न घेता) माझ्या राहणीमानावर न बोलता, आपल्याला लोक सोडून का जातात याचे उत्तर निदान आता तरी द्यावे व विकासावर बोलावे. त्यांनी विश्रामगृह बांधले पण जनतेला त्याचा उपयोग आहे का? आम्ही म्हाडामार्फत ८५० घरे बांधली व ते दिली हा आमच्या विकासाचा फरक आहे. त्यामुळे त्यांनी भुलभुलैय्या करू नये असा प्रतिहल्ला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आ. रोहीत पवार यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत केला.
जामखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी तयार केलेला वचननाम्याचे प्रकाशन गुरुवार रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले. यावेळी अयोजीत पत्रकार परिषदेत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी जोरदार टीका केली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी जाहीरनामा वाचन करून सविस्तर विश्लेषण केले. यावेळी भाजप शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, अमित चिंतामणी, दत्तात्रय वारे, काकासाहेब तापकीर, प्रविण घुले, अजय काशिद, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, संतोष म्हेत्रे, शेखर खरमरे, सचिन घुले, नगराध्यक्ष उमेदवार प्रांजल चिंतामणी व सर्व २४ उमेदवार, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना विधानपरिषद सभापती प्रा राम शिंदे म्हणाले, जामखेड शहराला स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी २०१९ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वतहा मान्यता दिली. राज्यात सत्ताबदल होताच सदर पाणीपुरवठा योजनेला विद्यमान आमदारांनी खिळ घातली त्यामुळे योजना लांबली. अडीच वर्षांनंतर सत्ताबदल होताच आपण १७० कोटी योजनेची अंमलबजावणी केली. तरीही त्यांनी चुकीच्या पध्दतीने भुमिपूजन केले. याबाबत आपण कधीही समोरासमोर चर्चा करायला तयार आहे असे आव्हान आ. रोहीत पवार यांना दिले.
प्रा. राम शिंदे पुढे म्हणाले, जामखेड नगरपरिषदसाठी त्यांच्या मुलाखती बाहेरगावी होत असेल तर पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी होणाऱ्या मुलाखती दिल्ली किंवा दुबईला होतील अशी बोचरी टीका आ. रोहीत पवार यांच्यावर करून आमच्या उमेदवार व नेत्यावर त्यांना बोलता येत नाही म्हणून वेगळ्या पद्धतीने निवडणूक नेत आहेत. तसेच त्यांनी फक्त तुम्हाला लोक सोडून का जातात याचे उत्तर द्यावे.
महायुती अभेद्य का राहीली नाही यावर बोलताना सभापती प्रा. शिंदे म्हणाले, दहा वर्षे निवडणूक झाली नाही. दोन्ही पक्षांतील कार्यकर्ते थांबण्यास तयार नव्हते तसेच आपण त्यांच्या बरोबर चर्चा झाली पण युती झाली नाही. अनेक राजकीय पक्षाचे पॅनेल लंगडे झाले आहेत फक्त आमचाच पॅनेल परीपूर्ण आहे. आ. रोहित पवार यांच्या कॉर्नर सभेला गर्दी होत नाही. त्यामुळे त्यांची काय अवस्था हे जनतेत दिसून आले आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुर्यकांत मोरे यांनी केलेल्या टिकेवर बोलताना ते म्हणाले एखाद्या व्यक्तीने पूर्ण सिस्टीमवर प्रश्न उपस्थित केला एक वेळा नाही तर चार वेळा अपमान केला. त्यामुळे त्यांना नोटीस दिली आहे. हक्कभंग समिती यावर निर्णय घेतील.
भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात जाहीरनामा विश्लेषण करताना म्हणाले, संपूर्ण जामखेड शहर धुळमुक्त करण्यासाठी दोनशे कोटी रूपये रस्त्यासाठी प्रस्तावित केले आहे. सर्वांसाठी घरे, मलनिस्सारण योजना, शुद्ध पिण्याचे पाणी, व्यापारी संकुल, महापुरुषाचे स्मारक उभारणे, शहरात चार ठिकाणी चौक सुशोभीकरण, त्रुटी दूर करून शहर विकास आराखडा, वाहनतळ, स्वतंत्र कृषी विभाग, पर्यटनाला चालना, ग्रामदैवताचा जिर्णोद्धार, सार्वजनिक शौचालये, सुसज्ज भाजीपाला, रोजगार व विकास असा विविध विकासाभिमुख जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. देशात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने शहरातील नागरीक विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप उमेदवारांना मतदान करून विजयी करतील अशी आशा व्यक्त केली.