जामखेड न्युज—–
जामखेड करमाळा रस्त्यावर सीना नदीच्या पुलाशेजारी मोठे भगदाड, वाहतूक बंद
कर्जत जामखेड मतदारसंघातील शेती व रस्ते प्रचंड नुकसान, तातडीने उपाययोजना कराव्यात – आमदार रोहित पवार
सीना नदीवरील जवळा आळजापूर करमाळा या रस्त्यावरील पुलाशेजारी भगदाड पडलं असून त्यामुळं जामखेड करमाळा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर टाळावा किंवा आवश्यकच असेल तर पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सीना व तिच्या उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात तुफान पाऊस पडत असल्याने रविवारी पुन्हा एकदा सीना नदीला महापुर आला होता. सीना नदीच्या महापुराने सर्व रेकॉर्ड ब्रेक करत रौद्ररूप धारण केले. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या चोंडी गावाला सीना नदीच्या महापुराचा वेढा पडला आहे. शिंदे यांच्या बंगल्याभोवती गुडघाभर पाणी आहे. चोंडीला चोहोबाजुने महापुराचा वेढा पडला आहे. अनेक घरात पाणी शिरले आहे. पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.चोंडीत सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहेत. महापुराने हाहाकार उडवला होता याच पुरामुळे सिनानदी जवळा आळजापूर पुलाजवळ मोठे भगदाड पडले आहे. यामुळे वाहतूक बंद आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आमदार रोहित पवार यांनी कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे तातडीने सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून काही पूल तर वाहून गेले आहेत. याबाबत मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील साहेब यांच्याकडे त्वरित दुरुस्तीची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या रस्ते व पुलांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांच्याकडे करण्यात आली.
याशिवाय, अतिवृष्टीमुळे अनेक बंधारे फुटल्याने सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार पवार यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील साहेब यांच्याकडे तातडीने दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
आ. रोहित पवार यांनी आशा व्यक्त केली की, सर्व माननीय मंत्री कोणताही भेदभाव न करता, सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने योग्य निर्णय घेतील.











