जामखेड न्युज – – –
भारताच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार या नावा ऐवजी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने दिला जाणार असल्याचा निर्णय केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयावर काँग्रेस पक्षासह इतर सर्व विरोधी पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर, नरेंद्र मोदी यांच्या राजकीय खेळीमुळे देशातील जनतेमध्ये ही या संदर्भात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
खेलरत्न पुरस्काराला मेजर, ध्यानचंद यांचे नाव देण्यास आमचा कोणता ही आक्षेप नाही, मात्र त्यासाठी सरकार सांगत असलेली कारण देशातील जनतेला पटलेली नाहीत. गांधी-नेहरू या नावाच्या तिरस्कारातून केंद्रातील मोदी सरकारने या पुरस्काराचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.
खेलरत्न पुरस्काराला राजीव गांधी यांचं नाव चालत नसेल तर, मग अहमदाबाद मधील मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदी यांचं नाव का दिलं आहे ? त्या स्टेडियमला एखाद्या देशातील महान क्रिकेटपटूचे नाव का दिलं नाही ? नरेंद्र मोदी यांचे क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष काय योगदान आहे ? असे अनेक प्रश्न काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी व जनतेने उपस्थित केले आहेत.
या क्रीडा पुरस्काराचे नाव बदलण्याचा निर्णय जनतेच्या मागणीचा विचार करून घेतला गेला असल्याचं पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं मोदींना शालूमधून जोडा हाणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा, रूपाली चाकणकर यांनी सरकारच्या या निर्णयावर ट्विट करत आपले सडेतोड विचार मांडले आहेत. त्या म्हणाल्या की, जर आपण जनतेची मागणी असल्यामुळे खेल रत्न पुरस्काराचे नाव बदललं असेल.
तर, ही गोष्ट चांगली आहे, पण जनतेच्या अजून ही काही मागण्या आहेत. त्यामध्ये महागाई कमी करा; युवकांना रोजगार द्या; महिलांना संरक्षण द्या; शेतकऱ्यांना सन्मान द्या; आणि त्याच बरोबर तुम्ही पंतप्रधान पदाचा राजीनामा द्या; या मागण्यांवर सरकार कधी निर्णय घेणार आहे ? असा प्रश्न ही रूपाली चाकणकर यांनी मोदी सरकारला विचारला आहे.