शासन आपल्या दारी महाराजस्व अभियानाचा विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थांनी फायदा घ्यावा – नायब तहसीलदार प्रदिप पांडुळे साकत मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध दाखल्यांचे वितरण
शासन आपल्या दारी महाराजस्व अभियानाचाविद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थांनी फायदा घ्यावा – नायब तहसीलदार प्रदिप पांडुळे
साकत मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध दाखल्यांचे वितरण
छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या प्रमाणे जनतेचे राज्य केले तसेच शासनाचे काम सुरू आहे. विविध दाखले वाटप ही वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. यात सध्या विविध विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थ यांना आवश्यक असणारे दाखले गावातच मिळत आहेत. सध्या शासनाचे जीवंत सातबारा करण्याचे काम सुरू आहे. या सर्व योजनांचा विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन नायब तहसीलदार प्रदिप पांडुळे यांनी केले.
महसूल विभागांतर्गत राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये यापुढे मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे असेही पांडुळे यांनी सांगितले.
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत साकतमध्ये महसूल विभाग, कृषी विभाग, आरोग्य विभाग यांच्या मार्फत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी नायब तहसीलदार प्रदिप पांडुळे, मंडलाधिकारी ए. एल. शिरसाठ, माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर, उपसरपंच राजाभाऊ वराट, अभिषेक पाटील, पोलीस पाटील महादेव वराट, मुख्याध्यापक दत्ता काळे, बाळासाहेब वराट, अजित वराट, तलाठी विकास मोराळे, ग्रामसेवक शिंदे, कृषी अधिकारी समाधान सोनवणे, हरीभाऊ मुरूमकर, डॉ.प्रशांत पाखरे (सीएचओ), रामहरी वराट, हरीभाऊ वराट, गणेश अडसूळ, बिभीषण वराट, यांच्या सह अनेक विद्यार्थी, पालक, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नायब तहसीलदार पांडुळे म्हणाले की, सध्या शासनाच्या वतीने अनेक योजना सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे लोकाभिमुख काम होते तसेच काम शासनाच्या वतीने सुरू आहे. जिवंत सातबारा करण्याचे तसेच वारस नोंद, वाटप, विविध दाखले अशी कामे सुरू आहेत. ज्यांचे काही कागदपत्रे अपुर्ण असतील त्यांना पुढील शिबीरात दाखले मिळतील. जमीनीवर आसलेला अनावश्यक बोजा कमी करून घ्यावा असेही आवाहन केले.
यावेळी बोलताना पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर म्हणाले की, शासन आपल्या दारी विविध योजना घेऊन आले आहे. लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या जात आहेत. हा शासनाचा स्तुत्य उपक्रम आहे.
सध्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकांचे उत्पादन वाढले आहे. कांदा साठवणूक करण्यासाठी कांदा चाळी आवश्यक आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कांदा चाळ मिळणे आवश्यक आहे. तसेच इतर पात्र लाभार्थी प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावावेत असे आवाहन केले.