Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा नाही, राज्य सरकारचा निर्णय

पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी CET परीक्षा नाही, राज्य सरकारचा निर्णय

0
359
जामखेड न्युज – – – 
 बारावीच्या निकालांच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश होतील, असं राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल लावला. राज्याचा सरासरी निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला. त्यामुळे आता इतक्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश कसे मिळणार? अशी चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पदवी प्रवेशासाठी CET परीक्षा घेतली जाण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अशी कोणतीही सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नसून बारावीच्या निकालांच्या आधारावरच पदवी परीक्षेचे प्रवेश होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात निर्णय जाहीर केला असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बारावीचा बोर्डाचा जो निकाल लागला आहे, त्याच्या आधारावरच आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. तुकड्यांची किंवा विद्यार्थ्यांच्या संख्येची आवश्यकता असेल, तर ३१ तारखेआधी त्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावेत. पण एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी विद्यापीठाने  घ्यायला हवी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत”, अशी घोषणा उदय सामंत यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल दहावी, अकरावीमध्ये मिळालेले सरासरी गुण आणि बारावीचे अंतर्गत मूल्यमापन याआधारे जाहीर करण्यात आला. निकालाची टक्केवारी जवळपास साडेआठ टक्क्य़ांनी वाढली असून, १३ लाख १४ हजार ९६५ नियमित विद्यार्थी उच्चशिक्षण संस्थांच्या उंबऱ्यावर प्रवेशासाठी दाखल झाले आहेत. यंदा नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच पुनर्परीक्षार्थीचे उत्तीर्णतेचे प्रमाणही वाढले असून, ६३ हजार ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर साधारण २६ हजार ३०० खासगीरित्या प्रविष्ट झालेले विद्यार्थी प्रवेशाच्या रांगेत आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या संख्या (९१ हजार ४२०)अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारण ८४ हजारांनी ही संख्या वाढली आहे. त्यामुळे पदवी प्रवेशांच्या अटीतटीला विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागणार आहे. विशेषत: मुंबई, पुणे, नागपूर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, नामवंत संस्थांमध्ये पारंपरिक किंवा स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळवणे कठीण होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!