जामखेड न्युज—–
जामखेडमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आजपासून विविध कार्यक्रम
तुफान विनोदी भारूड, कीर्तन, रक्तदान शिबीर,भव्य दिव्य अशी मिरवणूक
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा महाराष्ट्रात, देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात पोहोचावा, या दृष्टीकोनातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राष्ट्राचे अस्तित्व प्रस्थापित करून सबंध देशाला स्वातंत्र्याची नवी उर्मी आणि चैतन्यशक्ती प्रदान करण्याचे श्रेय निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांकडे जाते. त्यांच्या राज्याभिषेकामुळे सबंध देशामध्ये ‘मुद्रा भद्राय राजते’ म्हणजे जनतेच्या कल्याणाचे नवे पर्व सुरू झाले. जामखेड शहरात शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने भारूड, कीर्तन, रक्तदान शिबीर,भव्य दिव्य अशी मिरवणूक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज शुक्रवारी 6 जून रोजी रात्री 8 ते 10 भारूडाचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारूड सम्राट गोविंद महाराज गायकवाड भारूड मंडळ आळंदी देवाची यांचा तुफान विनोदी सोंगी भारूड कार्यक्रम आहे.
शनिवारी 7 जून रोजी रात्री 8 ते 10 पर्यंत शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांचे 14 वे वंशज हभप श्री योगीराज महाराज गोसावी श्री क्षेत्र पैठण जि संभाजीनगर यांचे कीर्तन होईल.
रविवारी दि. 8 जून रोजी रात्री 8 ते 10 शिवशाहीर हभप कल्याण महाराज काळे शेवगाव यांचे कीर्तन होईल तसेच सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. वरील सर्व कार्यक्रमाचे ठिकाण छत्रपती संभाजी महाराज मार्ग तहसील कार्यालयाच्या समोर जामखेड येथे असेल.