राष्ट्रीय महामार्गावर जामखेड करांचे मणके खिळखिळे, काम कधी पुर्ण होणार

0
454

जामखेड न्युज—–

राष्ट्रीय महामार्गावर जामखेड करांचे मणके खिळखिळे, काम कधी पुर्ण होणार

दोन वर्ष पूर्ण होऊनही जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अद्यापपर्यंत अपूर्णच असून, खाच खळगे व धुळीचा सर्वाधिक त्रास जामखेडकरांना सहन करावा लागत आहे. धुळीपासून संरक्षणासाठी पाणी मारले जाते यामुळे अनेक गाड्या घसरतात तसेच पाण्यामुळे व धुळीमुळे रस्त्यावर लहान मोठे टेमसुडे आलेली आहेत. यामुळे गाडी चालवताना धाडधाड होते मणके व गाड्या खिळखिळ्या झाल्या आहेत. लवकरात लवकर रस्ता पुर्ण करावा अशी मागणी होत आहे. रस्त्याबाबत आमदार, खासदार, सभापती गप्प का असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला आहे.


मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेले जामखेड-सौताडा रस्ता दळणवळणासाठी महत्त्वाचा असतानाही तो रस्ता पूर्ण होताना दिसत नाही. हा महामार्ग मराठवाड्याला जोडणारा महत्त्वपूर्ण मानला जातो. असे असतानाही ठेकेदार कंपनी या रस्ताकामाकडे दुर्लक्ष करत असून, दोन वर्ष झाले तरी रस्ताकाम अपूर्णावस्थेत आहे. याला जबाबदार कोण, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. सभापती, खासदार, आमदार गप्प का? नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे जामखेड-सौताडा महामार्गाचे काम लवकर पूर्ण होईल, अशी आशा नागरिकांची होती. मात्र, ती फोल ठरली. आता निवडणुका झाल्यामुळे रस्ताकामाला गती मिळत नसल्याची खंत नागरिकांतून बोलून दाखविण्यात येत आहे. आ. रोहित पवार व सभापती प्रा. आ. राम शिंदे यांनी रस्ताकामाबाबत टाळाटाळ केल्याचीही नागरिकांमध्ये चर्चा आहे.

जामखेड-सौताडा महामार्गाची अवस्था खराब झाल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दीडशे कोटी रुपये या रस्त्यासाठी देऊन गेल्या दोन वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामालाही सुरुवात झाली. राष्ट्रीय महामार्ग विभागाने पंचदेवालय मंदिर कर्जत फाटा ते खर्डा चौक व समर्थ हॉस्पिटलपासून पुढे बीड रोडपर्यंत दोन्ही बाजूने, तर काही ठिकाणी एका बाजूने सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. काम खुपच धिम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे होत आहे.


शहरातील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे असताना खर्डा चौक ते समर्थ हॉस्पिटलपर्यंत रस्त्याचे काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे. यातील खर्डा चौक ते बीड कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावरील अतिक्रमणे प्रकरण चर्चेचा विषय आहे. अनेक गोरगरीब लोकांच्या टपऱ्या हटविल्या मात्र मोठ्या लोकांचे पक्के कामे तशीच आहेत.

तालुक्याला गेल्या अडीच वर्षापासून एक नव्हे तर दोन-दोन आमदार लाभलेले असतानाही एकाही आमदाराने स्वतःहून पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडविला नाही. आमदार लक्ष देत नसल्याने अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रोहित पवार हे विधानसभेवर आमदार असून, प्रा. राम शिंदे हे विधानपरिषदेवर आमदार व आत्ता सभापती आहेत. दोन्ही आमदारांचे राजकीय ‘वजन’ असतानाही या रस्त्याचे काम अपूर्ण ठेवण्यात का आले हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

विधानसभा निवडणुकीआधी रस्त्याच्या कामाने जोर धरला असताना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कामे बंद तर केली नाही ना अशाही चर्चांना तोंड फुटले आहे. सध्या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने नागरिकाचे प्रचंड हाल होत आहेत. याकडे दोन्ही आमदारांनी जातीने लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्याची अपूर्ण कामे पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

खर्डा चौक ते विश्व क्रांती चौक हा अपुर्ण रस्ता असून कोठे उकरून ठेवलेला तर कुठे खडीचे ढिगारे तसेच रघुनंदन हाॅटेल पासून पुढे रस्ता खोदून खडी टाकलेली आहे तर काही ठिकाणी धुळ होऊ नये म्हणून पाणी मारले जाते. यामुळे गाड्या घसरतात व पाण्यामुळे रस्त्यावर खाचखळगे झाले आहेत. यामुळे मणके खिळखिळे झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here