माणुसकीच्या भावनेतून आमदार रोहित पवार ३ दिवसांपासून ६ ट्रक  अत्यावश्यक साहित्यासह कोकणात तळ मांडून..

0
441
जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –  ( सुदाम वराट)
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूर आणि दरडी कोसळल्याने निर्माण झालेल्या आपत्तीत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे मदतीला धावले आहेत. गेले तीन दिवस या आपत्तीग्रस्त भागात स्वतः चिखल तुडवत त्यांनी लोकांची भेट घेऊन त्यांना आधार दिलाच पण चादर, बिस्कीट, सॅनिटरी नॅपकिन्स, मॅगी नूडल्स आदी तातडीने आवश्यक असलेल्या ६ ट्रक आवश्यक वस्तूंचेही वाटप केले.
राज्यात ज्या-ज्या वेळी संकटाची परिस्थिती निर्माण झाली, त्या प्रत्येक वेळी आमदार रोहित पवार हे मदतीला धावून गेले आहेत. कोरोनाच्या काळातही संपूर्ण राज्यात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची मदत केल्याचे दिसून आले. त्याच धर्तीवर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील संकटातही आमदार रोहित पवार यांनी ‘कर्जत जामखेड एकात्मिक विकास फाऊंडेशन’, ‘बारामती ऍग्रो’ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सहा ट्रक (सुमारे २ लाख नग) आवश्यक साहित्याची मदत केली.
रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, सातारा जिल्ह्यातील पाटण तसेच कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्त नागरिकांना देण्यासाठी स्वतः जाऊन ही मदत तेथील प्रशासनाकडे सुपूर्द केली. यामध्ये सोलापुरी चादर, बिस्कीट पुडे, पाण्याच्या बॉटल, सॅनिटरी नॅपकिन्स, क्लोरीन पावडर, मॅगी नुडल्सचे पॅकेट, वॉटर बॉटल (MT), माचीस, मास्क अशा सुमारे दोन लाखाहून अधिक नग साहित्याचा समावेश आहे.
शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते हेही अहोरात्र मेहनत करत आहेत. काम करताना या सर्वांची ऊर्जा टिकून रहावी याकरिता या सर्व ‘फ्रंटलाईन वर्कर’साठी ORS एनर्जी ड्रिंकचे पॅकेटही देण्यात आले आहेत. शिवाय कोरोनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी सुमारे पंधराशे फेसशिल्ड मास्क देण्यात आले. मदत व बचावकार्य करत असताना काही अपघात झाल्यास प्रथमोपचार करण्यासाठी प्रथमोपचार पेट्यांही या मदत साहित्यात देण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त भागातील भेटीवेळी कोल्हापूरकरांनी आमदार रोहित पवार यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचे सांगिलते. याची दखल घेत तातडीने पिण्याच्या पाण्याचे १० टँकर शुक्रवारी (३० जुलै) कोल्हापूरकरांसाठी पाठवून दिले.
सांगली येथील औदुंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला भेट दिली असता तिथे रस्त्यावर साठलेला गाळ काढण्याचे सुरू असलेले काम पाहून आमदारांनी मागेपुढे न पाहता थेट फावडे हातात घेऊन गाळ भरत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. पूरग्रस्त भागात केवळ मदत पाठवून ते थांबले नाहीत, तर सलग तीन दिवस वेगवेगळ्या गावात जाऊन तिथल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करत त्यांना धीर दिला.
दरडी कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झालेल्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मिरगाव या गावचे पोलीस पाटील सुनील शेलार यांनी अनेक कुटुंबांना वेळीच घराबाहेर काढल्याने त्यांचा जीव वाचला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आमदार रोहित पवार यांनी त्यांची भेट घेऊन आभार मानले. समाजात चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची, अडचणीत असलेल्यांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची ही कृती सर्वांनाच भावल्याचे दिसत आहे. त्यामुळे अडचणीच्या काळात मदत घेऊन गेले असतानाही त्यांच्यासोबत फोटो, सेल्फी घेण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. यातून त्यांची लोकप्रियताच दिसून येते.
माझा केवळ खारीचा वाटा
“कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर आलेली ही आपत्ती संपूर्ण राज्यावरील आहे. त्याला सर्वांनी एकत्रितपणे सामोरे जाणे, हे आज आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असल्याने त्यात मी माझा खारीचा वाटा उचलला. असंख्य कार्यकर्ते, सामाजिक संस्था, प्रशासन हे सर्वजण मिळून या संकटावर मात करण्यासाठी काम करत आहेत, याचे समाधान वाटते.”
-रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here