पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यास जमावाकडून मारहाण, चौघा विरोधात गुन्हा दाखल
केज तालुक्यातील मस्साजोग येथे पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकाऱ्यास जमावाने काठी आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची माहिती अशी की, मस्साजोग ता. केज येथे अवादा एनर्जी नावाच्या पवनचक्की प्रकल्पाचे कार्यालय आहे. शुक्रवारी (दि.६) दुपारी १२:३० वा. च्या सुमारास अशोक नारायण घुले, सुदर्शन घुले, प्रतीक घुले (सर्व रा. टाकळी ता. केज) आणि इतर अनोळखी एक अनोळखी इसम अशा चौघांनी अनाधिकृतपणे कंपनीच्या गेट मधुन प्रवेश केला.
त्या ठिकाणी हजर असलेले कंपनीचे अधिकारी शिवाजी नाना थोपटे यांना शिवीगाळ केली आणि काठी व लाथाबुक्क्यांनी त्यांच्या पाठीवर, डोक्यात मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
कंपनीचे अधिकारी शिवाजी नाना थोपटे यांच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात अशोक नारायण घुले, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि एक अनोळखी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश बनसोडे हे तपास करीत आहेत.