जामखेड न्युज——
ज्ञानराधा पतसंस्थेच्या माध्यमातून लोकांना फसविणाऱ्या ठकास भेटला महाठक,
कुटेला लावला साडेतीन कोटींचा चुना
गुंतवणुकीचे आमिष आणि तशी बनावट कागदपत्रे तयार करून ज्ञानराधा मल्टिस्टेटचा संचालक सुरेश कुटेलाही एका महाठकाने तीन कोटी ५९ लाख रुपयांना चुना लावला. त्याला ठकविणाऱ्यामागेही आता ईडी, आर्थिक गुन्हे शाखेचा ससेमिरा सुरू झाला आहे.
गतवर्षी ऑक्टोबरच्या सुरवातीला ज्ञानराधा मल्टिस्टेटचा संचालक सुरेश कुटेच्या ‘द कुटे समूहा’ची सक्तवसुली संचालनालयाने तपासणी केली आणि तोच अध्यक्ष असलेल्या ज्ञानराधातून ठेवी काढण्यासाठी झुंबड उडाली. त्यानंतर महिनाभराने कुटे समूहात परदेशी गुंतवणुकीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये येणार, असे तो सांगत राहिला.
याबाबत वारंवार सोशल मीडियाद्वारे तो अशी माहिती देत होता. दुबईचे राजघराणे गुंतवणूक करणार असून प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे तो सांगायचा. त्याने घाईत नागपूरला एका पक्षात प्रवेश केल्याने परदेशी गुंतवणुकीसाठीच्या परवानग्यांसाठीच हा खटाटोप असल्याचे लोकांना वाटले.
अगदी त्याने पोलिसांनाही तसेच सांगितले. सोलापूरला त्याला भेटलेल्या सनदी लेखापाल, वकील आणि इतरांच्या शिष्टमंडळाला त्याने ब्लॅक रॉक ग्रुप कुटे समूहात आता १० हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार असून त्यासाठी मिनव्हांटा नावाचा समूह मध्यस्थी करत असल्याचे सांगून तशी कागदपत्रेही दाखविली.
पुढच्या पाच वर्षांत प्रत्येक वर्षी १० हजार अशी ५० हजार कोटींची गुंतवणूक समभागाच्या विक्रीतून येणार असल्याचे त्याचे सांगणे कागदपत्रे पाहून खरेही वाटले. आता हा ठक देखील आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीच्या रडारवर आहे. रकमेची होणार फॉरेन्सिक तपासणी ज्ञानराधामध्ये तीन लाख ७२ हजार ५६९ ठेवीदारांचे ३ हजार ७१५ कोटी रुपये ठेवीच्या स्वरूपात असल्याचे समोर आले आहे.
आता सुरेश कुटेने ही रक्कम कुठे गुंतविली आणि ज्ञानराधातून पैसा कसा वळविला, याची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. पोलिसांनी आतापर्यंत कुटे व त्याचा भाचा आशिष पाटोदेकरशी संबंधित पाच हजार कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्ता सील केल्या आहेत. तर, सक्तवसुली संचालनालयानेही त्याच्या १० कोटींच्या मालमत्तांवर टाच आणली आहे. पण, तपासात सामान्य ठेवीदारांना ठगविणाऱ्या कुटेलाही महाठक भेटल्याचे समोर आले.