जामखेड न्युज——
कर्जत- जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार विरूद्ध सुरेश धस सामना रंगणार ?
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून आमदार रोहित पवार यांनी उमेदवारी फिक्स आहे. तर महायुतीकडून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. आमदार रोहित पवार यांना रोखण्यासाठी महायुतीकडून एक तगडा उमेदवार देण्याची तयारी सुरु आहे. यातच सुरेश धस यांना चाचपणी करण्यासाठी भाजपा हायकमांड कडून सूचना मिळाल्या आहेत अशी चर्चा आहे यामुळे सुरेश धस यांचा वावर मतदारसंघात वाढला आहे. यामुळे आमदार रोहित पवार विरोधात सुरेश धस असा सामना होऊ शकतो.
कर्जत- जामखेड मतदारसंघात शरद पवार गटाचे रोहित पवार हे मागील 2019 सालच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यावेळी मोठ्या मताधिक्याने ते निवडून देखील आले होते. विशेष म्हणजे गेल्या 25 वर्षाच्या कर्जत – जामखेडच्या भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. मात्र यावर्षीची 2024 ची विधानसभा निवडणूक कोणत्याच विधानसभेच्या इच्छुक उमेदवाराला म्हणावी तेवढी सोपी नाही. सध्या आमदार प्रा. राम शिंदे हे विधान परिषदेचे सदस्य जरी असले तरी ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आनुशंगाने गेल्या अडीच वर्षांपासून आपल्या मतदार संघात सक्रिय काम करत आहेत. मात्र तरी देखील भाजपा बरोबरच कर्जत जामखेड मतदार संघात अजित पवार गटाच्या इच्छुकांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे कर्जत-जामखेड मतदार संघात महायुतीकडून मराठा उमेदवार देणार का? इतर कोणास उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या भाजपा पक्षश्रेष्ठीनी शेजारच्या मतदारसंघातील माजी आमदार सुरेश धस यांना रोहित पवार यांच्या विरोधात लढण्यासाठी चाचपणी करण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते कर्जत जामखेड मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. अनेक तरुण मंडळाच्या गणपती आरतीसाठी हजेरी लावत मतदारसंघाघाची चाचपणी सुरू केली आहे. यामुळे महाराष्ट्रातील एक तुल्यबळ लढत या मतदारसंघात दिसणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील बहुतेक विधानसभा मतदारसंघात प्रत्येक राजकीय पक्षाकडे विधानसभा उमेदवारी साठी एका पेक्षा जास्त तुल्यबळ उमेदवार आहेत. जे सर्व ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरू शकतात. मात्र याला अपवाद होता. जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघ त्यामुळे भाजपचे राम शिंदे यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक पातळीवरील पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी न देता आपल्याच घराण्यातील रोहीत पवार यांना भाजपच्या राम शिंदे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरून राजकीय बाजारपेठेत आणले अशी चर्चा आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे योगदान आहे हे नाकारून चालणार नाही. सध्या आमदार रोहित पवार यांना रोखण्यासाठी राज्यातील अनेक महायुतीचे नेते कंबर कसणार आहेत. यातच रोहित पवार विरोधात माजी मंत्री सुरेश धस यांना उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत.
जामखेड-कर्जत हा विधानसभा मतदार संघावर अजित पवार यांचा सुरूवाती पासूनच प्रभाव व दबदबा आहे. परंतु आता राज्यात अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय परिस्थिती पुर्णपणे बदललेली असून सर्वच विधानसभा मतदारसंघात त्याच्या परीणाम जाणवणार आहे. त्यानुसार जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघात देखील राजकीय परिस्थिती पुर्णपणे बदलली आहे. ही जागा भाजपाच्या वाट्याला असली तरी राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या विरोधात उमेदवार देताना उपमुख्यमंत्री अजित पवार व ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भुमिका महत्त्वाची असणार आहे. कारण रोहित पवारांना राज्य स्तरावर नेतृत्व करण्याची झालेली घाई पाहता काहीही झाले तरी त्यांना रोखून परत बारामतीला पाठविण्यासाठी राजकीय व्युव्हरचना तयार असल्याचे बोलले जात आहे. गरज भासल्यास त्यासाठी राम शिंदेंना थांबवून रोहीत पवारांच्या विरोधात भाजपा राम शिंदे यांना विश्वासात घेऊन मराठा उमेदवार देऊ शकतो याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार व राधाकृष्ण विखे पाटील यांची राजकीय भुमिका व चाल महत्त्वाची असणार आहे.
जामखेड-कर्जत विधानसभा मतदारसंघात कर्जत मधुन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुंड, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रविण घुले, कैलास शेवाळे, परमवीर पांडुळे तर जामखेड तालुक्यातुन रत्नदीप मेडिकल फौंडेशन अॅन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर (आबा) राळेभात, यांच्या पैकी ज्यांच्या नावावर अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील व राम शिंदे यांचे एकमत होईल त्याची उमेदवारी अंतिम केली जाईल अशी चर्चा सुरू आहे.
मागील नगरपरिषद निवडणूकीत तत्कालीन मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुरेश धस असा सामना झाला होता यात सुरेश धस यांनी नगरपरिषदेत सत्ता स्थापन केली होती. आता मात्र सुरेश धस भाजपामध्ये आहेत. तर रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आहेत. यामुळे अटीतटीची लढत होईल अशी शक्यता आहे.
आमदार रोहित पवार यांना रोखण्यासाठी राज्यातील महायुतीचे नेते प्रयत्न करणार आहेत. याचाच एक प्रकार म्हणून सुरेश धस यांना रोहित पवार यांना रोखण्यासाठी आणण्याची चर्चा आहे.
राज्यातील सर्वात हाय होल्टेज लढत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाची असेल असे बोलले जात आहे.