आमदार रोहित पवारांच्या विरोधात विरोधकांबरोबरच स्वकियांची मोर्चेबांधणी

0
1796

जामखेड न्युज——

आमदार रोहित पवारांच्या विरोधात विरोधकांबरोबरच स्वकियांची मोर्चेबांधणी

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी करताना दिसत आहे. राज्यात मविआ आणि महायुती यांच्यातच थेट सामना आहे. मात्र, पक्ष फुटीनंतर राज्यातील सर्वच मतदारसंघातील राजकिय गणितं बदलली आहेत. त्यातच मविआत सर्वकाही आलबेल असल्याचे वाटत असले तरी अनेक मतदारसंघात मविआमध्येही संघर्ष पाहायला मिळत आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार सध्या आमदार असताना काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच स्वपक्षातील अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना विधानसभेची जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पाच वर्षे आमदार रोहित पवार यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही अशी तक्रार मित्रपक्ष करत आहेत तर पाच वर्षे आम्हाला कसलेही विचारले नाही अशी स्वपक्षातील कार्यकर्त्यांची चर्चा आहे यातच अजित पवार यांनी या मतदारसंघात जास्तच लक्ष घातले आहे यामुळे आमदार रोहित पवारांनी या सर्वांचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री भाजपाचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कडून रोहित पवार यांनी निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. सरकारही महाविकास आघाडीचे आले. दोन अडीच वर्षात मतदारसंघात अनेक विकास कामे आणली, ग्रामीण रुग्णालय शंभर खाटांचे भव्य दिव्य इमारत, पंचायत समिती हेड क्वार्टर, पोलीस क्वार्टर, नगरपरिषद इमारत, नागेश्वर मंदिर रस्ता, बचत गट, निर्धुर चूल वाटप, शालेय विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटप, असे कितीतरी उल्लेखनीय कामे मार्गी लावली आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्ते न सांभाळता जनतेच्या हिताचे अनेक कामे केली यामुळे कार्यकर्ते दुखावत चालले कार्यकर्ते यांच्या कडे दुर्लक्ष होत गेले याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आमदार रोहित पवार यांना आहे.

 

2019 नंतर आता पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार स्थापन झाले. अजित पवार सरकार मध्ये सहभागी झाले यामुळे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अजित पवार लक्ष घालतील अशी शक्यता आहे. अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अजित पवार यांनी जामखेड च्या युवती संध्या सोनवणे यांना महिला युवती प्रदेशाध्यक्ष पद देऊन आमदार रोहित पवार यांच्या विरोधात कंबर कसली आहे.

2019 ला जे रोहित पवार यांच्या बरोबर होते त्यातील काहीनी भाजपा तर काहीनी अजित पवार गटात परत सहभागी झाले आहेत. यामुळे योग्य मान सन्मान मिळाला नाही म्हणून आपली वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत.

तसेच आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी म्हणून पाच वर्षांत शिवसेना उद्धव ठाकरे गट व काँग्रेस यांना कोणत्याही कार्यक्रमात किंवा कोठेही कसलाही मान सन्मान दिला नाही आघाडीचा धर्म पाळला नाही अशी कुरबुर दोन्ही तालुक्यात ऐकावयास मिळत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट व काँग्रेस दोन्ही पक्ष नाराज आहेत. याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज रोहित पवार यांना आहे.

लोकसभेला डॉ. सुजय विखे यांचा पराभव झाला व खासदार नीलेश लंके निवडून आले. प्रवरेचे पार्सल दक्षिणेने स्वीकारले नाही तसे विधानसभेसाठीही कर्जत जामखेड तालुक्यातील उमेदवार हवा अशी चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे. आम्ही सर्व त्यांच्या बरोबर राहू पण बाहेरचा उमेदवार नको अशीच चर्चा सगळीकडे सुरू आहे.


नुकतेच जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर (आबा)
राळेभात यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जामखेड बरोबरच कर्जत येथील अनेक नेते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. निमित्त वाढदिवसाचे मात्र रणनीती विधानसभेची अशीच चर्चा सगळीकडे सुरू होती.

 

प्रा. मधुकर राळेभात यांना शुभेच्छा देण्यासाठी कर्जत जामखेड मतदारसंघातील अनेक भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यातील अनेक नेत्यांनी हजेरी लावत शुभेच्छा दिल्या व एकच उमेदवार मतदारसंघातील द्यायचा असा निर्धार केला.

यावेळी भाजपाचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या बरोबरच माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.कैलास शेवाळे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड,उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद, निवृत्त कर आयुक्त नागेश जाधव ,काँग्रेस तालुका अध्यक्ष शहाजी राजेभोसले, राजेंद्र कोठारी, दिलीप बाफना, सभापती पै.शरद कार्ले, सुर्यकांत मोरे, प्रकाश सदाफुले, हरिभाऊ बेलेकर,माजी सभापती गोरख शिंदे,मुस्लिम पंच कमिटी चे अध्यक्ष अझहरभाई काझी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष राजेंद्र गोरे,प्रथम नगराध्यक्ष विकास राळेभात, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, प्राचार्य विकी घायतडक, उमर कुरेशी, वसिम कुरेशी, संतोष गव्हाळे,हभप ठाकरे महाराज,हभप गाडे महाराज, बापूसाहेब शिंदे, नगरसेवक दिगंबर चव्हाण,अमित चिंतामणी,मोहन पवार, अशोक शेळके, मोहन गडदे,इस्माईल सय्यद, मुख्तार सय्यद, इमरान कुरेशी, एडवोकेट बंकटराव बारवकर,हर्षल डोके, महारुद्र नागरगोजे, अमित गंभीर,महालिंग कोरे,मयुर भोसले,अनिल बाबर,प्रा.राहुल आहिरे,सरफराज पठाण, दिपक खेडकर, प्रविण उगले, गौतम बाफना,संदिप राळेभात, पिंटूशेठ बोरा आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here