जामखेड न्युज——
जामखेड ( खर्डा ) परिसरातील प्रसिद्ध बारा प्रतिज्योतिर्लिंग
श्रावण महिन्यातील महत्त्व

हिंदू धर्मात व भारतीय संस्कृतीत श्रावण महीन्याचे विशेष महत्व आहे. हा निसर्गाच्या श्रृंगाराचा काळ प्रत्येक जीवजंतूच्या आयुष्यात हरीयाली व खुशहाली घेऊन येतो म्हणून श्रावण मासाला विशेष धार्मिक मान्यता आहे.या महीन्यात केलेले देवदर्शन, भजन, पुजन, जप,तप,व्रत,उपवास यांनाही विशेष महत्व आहे.
प्राचीन धर्मग्रंथानुसार जगाचे पालनहार असलेल्या भगवान शिव म्हणजेच महादेवाचा आवडता महीना म्हणजे श्रावण महादेवाची उपासना करण्यासाठी बारा ज्योतिर्लिंग यात्रेला फार विशेष महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार बारा ज्योतिर्लिंग देवाधिदेव महादेवाचे साक्षात स्वरुप आहे. परंतू, देशभरात विखुरलेल्या बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणे सर्वसामान्यांसाठी व पैसे असूनही वेळ नसणाऱ्यांसाठी अशक्यच आहे. म्हणूनच या पवित्र तीर्थयात्रेला पर्याय म्हणून खर्डा परिसरातील बारा प्रतिज्योतिर्लिंगांच्या प्राचीन, भव्य दिव्य, शिल्पकला व स्थापत्यशैलीचे अजोड नमुना असलेली जागृत शिवमंदिरे ठरु शकतात. केवळ एक दिवसात या सर्व मंदिरांचे दर्शन घेत देशातील बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचे पुण्य पदरात पाडू शकता. पापमुक्ती, आत्म्याची शुद्धी ही देवदर्शना मागची कारणे इथे सहजसाध्य होऊ शकतात. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून, चालणाऱ्या धावपळीतून मनाला पुन्हा एका ठिकाणीं शुचिर्भूत करणे या हेतूतून एकदा खर्डा परिसरातील बारा प्रतिज्योतिर्लिंगांची यात्रा करण्याचे आवाहन खर्डा परिसर पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास कृती समितीने केले आहे. ही यात्रा आपल्याला एक वेगळीच अनुभूति देईल आणि अगदी नास्तिक माणूसही या सफरीत अध्यात्मिक शक्तीची, श्रद्धेची व निसर्गाशी एकरुपतेची अनुभूति घेऊ शकतो.

खर्डा शहर व परिसरातील बारा प्रतिज्योतिर्लिंग मंदिरांना भेट देण्यासाठी सुमारे ५० कि.मी. चे अंतर पार पाडावे लागते. या सफरीत हिरवेगार गालीचे असलेल्या डोंगररांगा, त्यातून ओढा व झऱ्याच्या रुपात वाहणारे पावसाचे पाणी, पशुपक्ष्यांची किलबिलाट, गर्दीरहीत व विलक्षण शांततेचा अनुभव देणारी पुरातन, भव्य मंदिरे आपल्या अंतरात्म्याला अध्यात्म व निसर्गाशी एकरुप करुन देण्याचा विस्मयकारी, रोमांचक अनुभव देतात. एकदा का ही तीर्थयात्रा केली तर तुम्ही नास्तिक जरी असाल तरीही देव,धर्म व अध्यात्मिक शक्तीच्या प्रेमात पडाल याची खात्री आहे.
अधिक माहीतीसाठी खर्डा परिसर पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास कृती समिती चे पदाधिकारी श्री.विजयसिंह गोलेकर ९४२२२००००१, श्री.संतोष थोरात ९४२०३४२३४२, श्री.दत्तराज पवार ९४२२२६८४००, श्री.शेखर देशमुख ९८९०५०१४४७ या क्रमांकावर संपर्क करावा.

आता आपण खर्डा परिसरातील बारा प्रतिज्योतिर्लिंग मंदिरांची एक एक करुन माहीती घेऊ-
१) ओंकारेश्वर मंदिर,खर्डा
खर्डा परिसरातील बारा प्रतिज्योतिर्लिंग मंदीरांपैकी चार मंदीरे खर्डा शहरात आहेत. त्यापैकी एक असलेले हे ओंकारेश्वराचे मंदीर शहरातील शुक्रवार पेठ या भागात आहे. सर्व बारा मंदीरांपैकी सर्वात सुंदर, सुबक रचना असलेले व सुस्थितीत असलेले हे शिवमंदीर आहे. मंदीराला पुर्वाभिमुखी एकमेव भव्य प्रवेशद्वार असून भोवती तटबंदी आहे. प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच दोन्ही बाजूच्या भव्य दिपमाळा लक्ष वेधून घेतात. मंदीरासमोरील नंदीही भव्य आहे. नंदीलगत एका चबुतऱ्यात एक दगडी मोठी घंटा आहे व ती एखाद्या धातूप्रमाणे आवाज देते.
या मंदीराच्या समोरच अष्टकोनी पुरातन बारव आहे. त्याला बारमाही पाणी असते. या बारवाचे पाणी एका ठराविक पातळीवर आल्यास ओंकारेश्वराच्या गाभाऱ्यात पाणी येते व शिवलिंग पूर्णतः पाण्याखाली जाते. हे एक जाग्रुत देवस्थान म्हणून परिचित आहे.

२) कोटेश्वर महादेव मंदिर, खर्डा
खर्डा व परिसरातील बारा प्रतिज्योतिर्लिंग शिवमंदीरांपैकी एक असलेले हे कोटेश्वराचे मंदिर ओंकारेश्वर मंदीराच्या मागेच शुक्रवार पेठेत आहे.
मंदीर अतिशय सुस्थितीत आहे. या सर्व बारा प्रतिज्योतिर्लिंगांची प्रतिष्ठापना करणारे आप्पासाहेब उर्फ सुलतानराजे निंबाळकर यांना ओंकारेश्वर मंदीर परिसरात एक कोटी रुपये खर्च करून विविध कामे करावयाची होती.परंतू, त्यातील शिल्लक रकमेत त्यांनी हे मंदीर बांधले व म्हणूनच या शिवलिंगाला कोटेश्वर असे नाव पडले अशी आख्यायिका आहे.
ओंकारेश्वर व कोटेश्वराला एकाच प्रवेशद्वारातून यावे लागते. दोन्ही मंदीरे एकाच तटबंदीच्या आत आहेत.
कोटेश्वर मंदीरालगतच दुर्मिळ असे नारदमुनींचे मंदीर आहे. त्यातील भव्य दगडी मुर्ती लक्ष वेधून घेते.
या कोटेश्वर मंदीराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मंदीराला शिखर नाही. लगतच्याच ओंकारेश्वर मंदीराचे भव्य शिखर व त्यावरील विविध देवतांच्या मुर्त्यांची रचना आपली नजर खिळवून ठेवते.
या मंदीर परिसरात खूप मोठे वृक्ष आहेत. त्यावर वटवाघुळे, मधमाशांचे मोहाळ इ. चे मोठ्या प्रमाणावर अधिवास आहे.
३) कपिलेश्वर शिवमंदिर, खर्डा
खर्डा शहरातच हे सुंदर मंदीर आहे. वैशिष्ट्यपूर्ण शिखर व हेमाडपंथी रचना हे या मंदीराचे वेगळेपण आहे. शिवलिंगही वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक आहे.
मंदीरासमोरील नंदीलगत एका मोठ्या शिळेवर आणखी एक पिंड दिसून येते. मंदीराच्या दारातच पूरातन वेस आहे.

४) कर्पुरेश्वर महादेव मंदिर, खर्डा
खर्डा शहरात कसबा पेठेला लागून हे पुरातन व जागृत मंदीर आहे. येथील शिवलिंग/पिंड स्फटीकाप्रमाणे पांढरी आहे त्यामुळेच या शिवलिंगाला कर्पुरेश्वर असे नाव पडले असावे. मंदीराला पुर्व दिशेला एक भव्य प्रवेशद्वार असून भोवती तटबंदी आहे.
येथील वातावरण सतत प्रसन्न असते.
कर्पुरेश्वर मंदीरालगतच गोपाळकृष्णाचे मंदीर आहे. कृष्णाची मुर्ती खुपच सुबक व वैशिष्ट्यपूर्ण आहे. ह्या दोन्ही मंदीरांची रचना सारखीच आहे व दोन्हींना वेगवेगळी दोन शिखरे आहेत. कृष्ण मंदीरासमोरील सभामंडप नव्याने बांधण्यात आला आहे.
५) मल्लीकार्जून शिवमंदिर,खर्डा
हैदराबाद-शिर्डी महामार्गावर खर्ड्यापासून भूम कडे जाताना १.५ किलोमीटर अंतरावर हे मल्लीकार्जूनाचे मंदीर आहे. या मंदीराला शिखर नाही. पुरातन मंदीरासमोर नव्याने सभामंडप तसेच भोवती संरक्षक भिंत बांधली आहे. या मंदीराशेजारीच देवीमंदीर आहे.याठिकाणी खर्डेकर दसऱ्याच्या सणाला सीमोल्लंघन करायला येतात.
येथील शिवलिंग मंदीरातील पार्वतीची पुरातन व सुबक मुर्ती भाविकांसाठी श्रद्धेय आहे.
६) मोरेश्वर(मोराप्पा) शिवमंदिर, खर्डा
खर्डा-ईट रस्त्यावर खर्ड्यापासून साधारण १.५किलोमीटर अंतरावर हे मंदीर आहे. खर्ड्याकडून येताना मुख्य रस्त्यापासून डावीकडे साधारण ५००मीटरवर हे एका ओढ्याच्या काठावर मंदीर आहे.
या मंदीराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे गुप्तलिंग आहे. श्रावणात याठिकाणी मोठा भंडाराही असतो. हे एक खूप जागृत देवस्थान आहे.
पुर्वी याठिकाणी खूपच छोटेखानी मंदीर होते परंतू आता या परिसरातील शेतकऱ्यांनी मिळून सुंदर मंदीर बांधले आहे.
७) बलखंडेश्वर/बलखंडी शिवमंदिर, खर्डा
खर्डा-जातेगांव रस्त्यापासून साधारण ७००मीटरवर व खर्ड्यापासून साधारण २ किलोमीटर वर वनविभागाच्या हद्दीत हे छोटेखानी मंदीर आहे. मंदीरालगतून जाणारी बालाघाटची डोंगररांग व त्यावरील गर्द हिरवाई मन मोहून टाकते. ह्याच बालाघाटच्या उपरांगेत मंदीराजवळच सीताकुंड आहे.डोंगरावर या कुंडाच्या ठिकाणातून पाणी बाहेर येते. मोठ्या पावसात इथे धबधबाच तयार होतो. राम व सिता वनवासात असताना या ठिकाणी आले होते व सितेच्या आंघोळीसाठी रामाने बाण मारुन ह्या सीताकुंडाची निर्मिती केली अशी आख्यायिका आहे. ह्याच डोंगररांगेतील शिखरावर पुढे पाच पांडव म्हणून ठिकाण असून पांडव वनवासात असताना ते काही काळ येथे निवासी होते अशीही आख्यायिका आहे. अशाप्रकारे, रामायण व महाभारत असा दोन्ही संदर्भ असलेला हा परिसर खूपच रमणीय असा आहे. ह्या परिसरात खूपच मोठी व सुंदर वनराई असून अनेक खर्डेकर इथे खास वनभोजनासाठी येतात.
ह्या मंदीराजवळ वनविभागातच खर्ड्याचे ग्रामदैवत कानिफनाथ(कान्होबा)चे मंदीर आहे.येथेच होळी दिवशी यात्रा भरते.
वनविभागाने या परिसरात खर्डा-जातेगांव रस्त्यालगत वनउद्यान उभारले आहे. ते परिसराचे आकर्षण ठरत आहे.
८) अमृतलिंग शिवमंदिर, खर्डा
खर्ड्यापासून पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर बालाघाटच्या उप डोंगररांगेत पुरातन बारा प्रतिज्योतीर्लिंग मंदिरांपैकी एक असलेले अमृतलिंग शिवमंदिर आहे.
या एकाच ठिकाणी तीन वेगवेगळी शिवमंदिरे असून हेमाडपंथी बांधकाम आहे. मंदिराचा कळस हा ३२ शिळांचा आहे.
हे मंदिर वनक्षेत्रात येत असल्याने पावसाळ्यात गर्द झाडी व हिरवळ मन मोहवून टाकतात. जवळच असणाऱ्या अमृतलिंग तलावामुळे या परिसराचे निसर्ग सौंदर्य अधिकच खुलते.
९) गांधणेश्वर महादेव मंदिर, गितेवाडी(खर्डा)
खर्ड्यापासून उत्तरेला, गितेवाडीच्या पुढे खर्ड्यापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर पुरातन बारा प्रतिज्योतीर्लिंग मंदिरांपैकी एक गांधणेश्वर शिवमंदिर आहे.
मानवी वस्तीपासून दूर निसर्गाच्या कुशीत हे मंदिर आहे.
मंदिराला एक मुख्य प्रवेशद्वार असून किल्ल्याप्रमाणे तटबंदी आहे. आतमध्ये बारा कमानी असलेला भव्य नगारखाना/पडवी आहे.
१०) संगमेश्वर शिवमंदिर, दरडवाडी(खर्डा)
खर्डा-जामखेड रस्त्यावर खर्ड्यापासून चार किलोमीटर अंतरावर अगदी महामार्गालगत हे मंदिर लक्ष वेधून घेते. मंदिराचा जिर्णोद्धार केला असून शिखर महादेवाच्या पिंडीच्या आकाराचे आहे व त्यावर नागराज फडा काढून उभा असल्याचे शिल्प प्रवाशांचे लक्ष वेधून घेते. या मंदिराच्या पुढेच खैरी नदीला तिची उपनदी येऊन मिळते. या दोन नद्यांच्या संगमामुळे या क्षेत्राला संगमेश्वर हे नाव पडले.
११) केदारेश्वर महादेव मंदिर, सातेफळ
खर्डा-सोनेगांव रस्त्यावर खर्ड्यापासून सुमारे ५ किलोमीटर वरील सातेफळ गावाच्या शिवारात हे केदारेश्वराचे मंदीर आहे. मुख्य रस्त्यापासून आतमध्ये सुमारे ५००मीटर अंतरावर,मानवी वस्तीपासून दूर हे मंदिर आहे.
पुर्वाभिमुखी असलेल्या या मंदीराला एक प्रवेशद्वार व सभोवती दगडी तटबंदी आहे. मंदीराची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून शिवलिंगही आकर्षक आहे.मंदीराचे शिखर व त्यालगतचे मनोरे, छतावरच नगारखान्याप्रमाणेची रचना असलेली घुमटे मंदीराचे बाह्यसौंदर्य खुलवतात.
सातेफळ ग्रामस्थांच्या पुढाकारातून इथे आता महाशिवरात्रीला यात्रोत्सव सुरू करण्यात आला असून श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भंडाराही असतो.
येथून जवळच खैरी मध्यम प्रकल्पाचा तलाव आहे. यामुळे हा परिसर चांगलाच बागायती झाला असून ह्या परिसराला जामखेड तालुक्याची “ग्रीन व्हैल्ली” (Green Valley) म्हणून संबोधले जाते. मंदीरालगतच ऊसाचे भरपूर क्षेत्र असल्याने परिसरातील शिवार हिरवेगार दिसते.
१२) बेलेश्वर शिवमंदिर, ता.भूम,जि.उस्मानाबाद.
खर्डा-ईट रस्त्यावर खर्ड्यापासून ८ किलोमीटर अंतरावर मुंगेवाडीच्या पुढे हे खर्डा व परिसरातील बारा प्रतिज्योतिर्लिंगांपैकी सर्वात भव्यदिव्य मंदीर आहे.
मंदीरापासून अवघ्या ५०० मीटरवर उस्मानाबाद जिल्हाची सीमा सुरू होते.
याठिकाणी पुजाऱ्यांची घरे वगळता कुठलीही वस्ती नसली तरी वर्षभर भाविकांची वर्दळ असते. मंदीराचा परिसर गर्द हिरवाईने नटलेला आहे. बालाघाटच्या डोंगररांगा या निसर्गरम्य परिसराचे सौंदर्य आणखीनच खुलवतात. वनविभागाने प्रयत्नपूर्वक निगा राखलेली हिरवी गर्द झाडी अनेक वन्य पशुपक्षांचे आश्रयस्थान बनले आहे.
हे मंदीर भव्य व उंचावर असल्याने दुरूनच एखाद्या किल्ल्याप्रमाणे दिसते. मंदीराभोवती किल्ल्याप्रमाणे मोठी तटबंदी असून बुरूजही सुस्थितीत आहेत. तटबंदीच्या आत पायऱ्या उतरताना प्रथम पुजाऱ्यांची घरे नंतर नगारखान्यासहचे दुसरे प्रवेशद्वार व पुन्हा पायऱ्या उतरल्यानंतर पाण्याचे पुरातन कुंड, मुख्य मंदीर,भुयार,भटारखाना इ. दिसून येतात. थोडक्यात मंदीर बांधताना किल्ल्याप्रमाणे सर्व सुविधा तटबंदी च्या आत करण्यात आल्या आहेत. मंदीरातून एक भुयारी मार्ग खर्ड्यापर्यंत जातो. मुख्य मंदीरात वेगवेगळ्या तीन देवांचे गाभारे आहेत. मध्यभागी बेलेश्वराचे शिवलिंग(पिंड) आहे. या पिंडीवर आपणास बेलाचा आकार दिसतो म्हणून या क्षेत्राला बेलेश्वर असे नाव पडलेले आहे. डाव्या बाजूच्या गाभाऱ्यात एकमुखी दत्ताची खुपच सुबक व सुंदर मुर्ती आहे. तर उजव्या गाभाऱ्यात रेणुका देवीचे ठाण आहे. या मंदीरासमोर विठ्ठल रुक्मिणी चेही छोटेखानी मंदीर असून त्यामुळे परिसरातील गांवात या क्षेत्राला धाकटी पंढरी म्हणूनही ओळखले जाते.विठ्ठल मंदीरासमोरच या ठिकाणी अनेक वर्ष वास्तव्यास असलेल्या तुकाराम महाराजांची जिवंत समाधी आहे. मुख्य मंदीराला लागूनच एक गुहा असून त्याठिकाणी तुकाराम महाराज तपश्चर्येसाठी बसत.तुकाराम महाराज हे तत्कालिक संस्थानिक अप्पासाहेब उर्फ सुलतानराजे निंबाळकरांचे गुरू होते व त्यांचे खर्ड्याला येणे जाणे असे.
समाधीला लागूनच मंदीराच्या पाणीव्यवस्थेसाठी पक्के दगडी बांधकाम असलेला बारव(कुंड) आहे. त्याला पायऱ्याही आहेत. या कुंडासमोर खूप मोठे व जुने चिंचाचे झाड आहे. या चिंचेचा पाला खाऊन कुंडातील थंड व गोडी असलेले पाणी पिल्यास माणूस निरोगी तर होतोच परंतु अनेक असाध्य रोग बरे होतात अशी आख्यायिका आहे व परिसरातील अनेकांनी त्याचा अनुभवही घेतला आहे.
या तटबंदी असलेल्या मुख्य मंदीराच्या समोर श्री स्वामी सच्चिदानंद यांच्यासह चार योगी पुरुषांच्या जिवंत समाध्या आहेत. त्यामुळे हा परिसर खूप पवित्र व पावन समजला जातो.
येथे यापुर्वीच अनेक सुखसुविधा निर्माण झाल्या आहेत. मंदीरापर्यंत येण्यासाठी पक्का डांबरी रस्ता आहे. मंदीर परिसरात पेव्हींग ब्लॉक चे काम पुर्ण झाले आहे. सभामंडप,स्वच्छताग्रुह आदी सुविधा तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत पुर्ण झाली आहेत. येथे अनेक विवाह समारंभही होतात.
आजच्या धावपळीच्या युगात गर्दीपासून दूर, निसर्गरम्य ठिकाणी देवदर्शनाचा अलभ्य लाभ घ्यायचा असेल तर बेलेश्वरासह खर्डा परिसरातील बारा प्रतिज्योतिर्लिंग मंदीरांसारखा दुसरा पर्यायच असू शकत नाही.
या स्थळांसह खर्डा येथील ऐतिहासीक भुईकोट किल्ला, जगातील सर्वात उंच भगवा ‘स्वराज्य ध्वज’, श्री क्षेत्र सिताराम गड, निंबाळकर गढी, निंबाळकर समाधी (छत्री), ताकभाते वाडा, खर्ड्याची तटबंदी व वेस इ. खर्ड्याचा समृद्ध धार्मिक व ऐतिहासीक ठेवाही आपणाला पाहता येईल. तर कधी येताय सहकुटुंब या अनोख्या सफरीला..??





