जामखेड न्युज——
पुजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
यूपीएससी नेही केली निवड रद्द
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) उमेदवारी रद्द करण्यात आलेली पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन अर्ज पतियाळा हाऊस न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. परीक्षेत फसवेगिरी आणि बनवेगिरी केल्याच्या आरोपानंतर अलीकडेच ‘यूपीएससी’ने खेडकर हिची निवड रद्द केली होती.
खेडकर हिच्यावरील आरोपांचा तपास ‘यूपीएससी’ व लालबहादूर शास्त्री अकादमीकडून सुरु आहे. जिल्हाधिकाऱ्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यामुळे आपणास लक्ष्य केले जात असल्याचा दावा पूजा खेडकरने वकिलांमार्फत न्यायालयात केला होता. दुसरीकडे, खेडकर हिने फक्त आम्हालाच नव्हे तर समाजाला फसवले असल्याने तिच्या अटकेचे निर्देश दिले द्यावेत, अशी विनंती ‘यूपीएससी’कडून करण्यात आली होती.
अटकपूर्व जामीन मिळावा, असा अर्ज तिच्यातर्फे करण्यात आला होता. मात्र, हा अर्ज आज फेटाळण्यात आला. पूजा खेडकर हिच्याशिवाय अन्य कोणा उमेदवारांनी निकषात बसत नसता नाही क्रिमीलेअर सुविधेचा लाभ घेऊन ओबीसी कोट्यातून अर्ज केला होता का? अथवा दिव्यंगत्वासाठीचे पात्रता निकष ओलांडले होते, याचा तपास ‘यूपीएससी’ने करावा, असे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार यांनी सुनावणीदरम्यान दिले.
अटक होण्याची शक्यता
पतियाळा हाऊस न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकर हिला अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खेडकर हिच्याविरोधात आधीच पोलिसांत गुन्हा दाखल आहे. वडिलांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असूनही क्रिमीलेअर सुविधेचा लाभ घेऊन ओबीसी कोट्यातून अर्ज केल्याचा तसेच दिव्यांग असल्याची चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोप तिच्यावर आहे.