पैठण- पंढरपूर पालखी मार्गाचे साडेसहा वर्षापासून रखडलेले काम पूर्ण व्हावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस व वारकऱ्यांचे पांडूरंगाला घातले साकडे

0
441

जामखेड न्युज——–

पैठण- पंढरपूर पालखी मार्गाचे साडेसहा वर्षापासून रखडलेले काम पूर्ण व्हावे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस व वारकऱ्यांचे पांडूरंगाला घातले साकडे

 


पैठण पंढरपूर पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व सरकार, संबंधित अधिकारी, ठेकेदार यांना काम त्वरित पुर्ण करण्याची सद्बुद्धी यावी अशी प्रार्थना साक्षात पांडुरंगाला करण्याचे अनोखे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, खर्डा शहरच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांना सहभागी करत केले.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ ई असलेल्या पैठण- पंढरपूर पालखी मार्गाचे काम गेल्या तब्बल साडेसहा वर्षांपासून रखडलेले आहे. आत्तापर्यंत झालेले निकृष्ट दर्जाचे काम, नाल्यांचे काम नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी, एकाही पुलाचे काम पुर्ण नसणे, वाढते अपघात इ. मुळे यावरून प्रवास करणारे स्थानिक, प्रवासी व वारकरी यांना पहिलाच रस्ता बरा होता असे म्हणण्याची वेळ आली आहे. वनविभागाची हरकत, शेतकऱ्यांनी रस्ता अडवला अशी कारणे देत गेल्या साडेसहा वर्षात ठिकठिकाणी रस्ता अपुर्ण ठेवण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात पैठण ते खर्डा या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला व काम सुरू झाले परंतु सध्या हे काम पुर्णतः बंद आहे. हे काम त्वरित पूर्ण करत त्याचा दर्जा उत्तम असावा तसेच या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील खर्डा ते पंढरपूर या मार्गासाठी तात्काळ निधी मंजूर व्हावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली.

या पालखी मार्गावरुन संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांची पालखी जाते. त्याचबरोबर संत भगवानबाबा, संत गोरा कुंभार यांच्या सह अनेक लहानमोठ्या दिंड्या विठ्ठल नामाचा जयघोष करत मार्गक्रमण करतात. नवीन शासकीय धोरणानुसार वारकऱ्यांना बऱ्याच सोयी उपलब्ध करून देतात परंतु इकडे धडाचा रस्ताच नसल्याने वारकरी, पालखी वाहन व दिंडीतील इतर वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

आजच्या आंदोलनात राष्ट्रवादी चे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी वाटसरू वारकऱ्यांना बरोबर घेत रस्त्यावर बसत काही वेळ ठिय्या आंदोलन केले व संबंधितांना सद्बुद्धी देण्यासाठी प्रार्थना केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे जामखेड तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, खर्डा शहराध्यक्ष महालिंग कोरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, श्रीकांत लोखंडे, प्रकाश गोलेकर,भिमा घोडेराव, विकास शिंदे, शशिकांत गुरसाळी, संतोष गोलेकर,संतोष गुरसाळी इ. उपस्थित होते.

चौकट
पालखी मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. हा महामार्ग पुर्ण व्हावा यासाठी याअगोदर ही अनेक आंदोलने झाली.येथील आ.रोहित पवार यांनी ही थेट देशाचे भुपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिल्ली येथे भेट घेत साकडे घातले परंतू सरकार, अधिकारी व ठेकेदार यांच्या अनास्थेमुळे सध्या काम बंद आहे. यापुढे तीव्र आंदोलन करण्याची भूमिका राहील.
_ विजयसिंह गोलेकर, तालुकाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, जामखेड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here