जामखेड न्युज——
उत्तरप्रदेश सत्संगामधील चेंगराचेंगरीत 116 जण ठार
हाथरसची दुर्घटना घडल्यानंतर प्रवचन देणारा भोले बाबा फरार
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या महाभंकर घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. सत्संगावेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 116 जणांचा मृत्यू झाला. भोलेबाबा नावाच्या महाराजाच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी होऊन शेकडो भाविकांचा बळी गेला आहे. लहान मुलं, महिला, पुरुष आणि अनेक वृद्धांचाही यात बळी गेलाय आणि या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर भोलेबाबा आता फरार झाला आहे.
सत्संगामधील चेंगराचेंगरीत 116 जणांनी जीव गमावला
लहान मुलं आणि वृद्धांचाही चेंगरून काही क्षणात मृत्यू झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील हाथरस येथील आहे. इथं भोलेबाबाचा सत्संग सुरू होता. या सत्संगाला 50 हजाराहून जास्त भाविक आले होते. सत्संग संपल्यानंतर घरी जाताना झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 116 भाविकांचा मृत्यू झाला आहे आणि मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीतीही व्यक्त केली जातेय. सत्संग संपल्या संपल्या बाहेर पडण्यासाठी प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली. बाहेर जाण्याच्या वाटेत दुचाकी पार्क केल्या होत्या, त्यामुळे अडथळे वाढले. या सगळ्या गोंधळात लोक एकमेकांवर पडत गेले आणि अनेक भाविकांचा गुदमरून मृत्यू झाला.
हाथरसमध्ये नेमकं काय घडलं?
सिकंदराराऊच्या फुलरई गावात भोलेबाबांचा सत्संग सुरु होता. सत्संगसाठी प्रचंड गर्दी जमली होती. या सत्संगामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक होती. सत्संग संपल्यावर बाहेर पडण्यासाठी रेटारेटी झाली. पुढे जाण्याच्या नादात चेंगराचेंगरी झाली. लोक एकमेकांवर पडू लागले, भाविक चिरडले गेल्यानं मृतदेहांचा खच पडल्याचं पाहायला मिळालं.
ज्याच्या सत्संगानंतर ही भयंकर दुर्घटना घडली, तो भोलेबाबा नेमका कोण आहे, ते जाणून घ्या.