जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यात वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या मंजुरीसाठी मोठे रॅकेट कार्यरत सर्रास पैशाची मागणी
दोन दिवसांपूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभाची जलसिंचन विहीर मंजूर करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना एक सरपंच पती प्राध्यापक तसेच ग्रामसेवक रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले दोघांना अटक झाली पुढील कारवाई सुरू आहे. तक्रारदाराने तक्रार केली म्हणून दोघे पकडले पण तालुक्यात खुप मोठे रॅकेट कार्यरत आहे. याचा बिमोड कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे.
शासनामार्फत वेगवेगळ्या योजना गावासाठी तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी आहेत या योजनेचे कागदपत्रे गोळा करून फाईल सादर करण्यापासून पैशाची मागणी सुरू होते. अनेक कारणे सांगितली जातात साहेब सही करत नाहीत. आँनलाईन करायचे आहे.
पैसे दिले कि, ताबडतोब काम होते. एखाद्याने पैसे दिले नाही तर अनेक अडचणी सांगितल्या जातात. सर्व्हर डाउन आहे. साहेबांची सही नाही. कागदपत्रे कमी आहेत, गावातून तक्रार आहे. असे कारणे सांगून लाभार्थ्यांना परेशान केले जाते. काम मंजुरीसाठी पंचायत समिती परिसरात मोठे रॅकेट कार्यरत आहे.
यात अनेक कर्मचारी, अधिकारी, पदाधिकारी यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत च्या ठरावापासून तर पंचायत समितीत फाईल दाखल करेपर्यंत अनेक दलाल मलिदा लाटत आहेत. लाभार्थ्यांना दररोज चकरा मारणे अशक्य नसल्याने तेही पैसे देऊन मोकळे होतात.
जामखेड तालुक्यातील वाघा येथे विहीर खोदण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो पंचायत समिती जामखेड येथे पाठवण्या करिता तक्रारदार यांच्याकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक नेताजी शिवाजी भाभड व सरपंच पती प्राध्यापक शामराव मानिकराव बारस्कर या दोघांना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले यामुळे जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. हे एक प्रकरण झाले पण गावोगावी व पंचायत समिती येथे सर्रास लूट सुरू आहे.
लाभार्थी शेतकऱ्याला विहीरीसाठी चार लाख रुपये अनुदान आहे. जामखेड तालुक्यात शेकडो विहिरींचे कामे सुरू आहेत. विहिरी मंजुरी साठी एक मध्यस्थी यंत्रणा जामखेड पंचायत समिती आसपास सुरू आहे. लाभार्थी शेतकरी गाठणे तुझी विहीर साहेबांकडून मंजूर करून घेतो यासाठी काही पैसे द्यावे लागतील म्हणून प्रस्ताव घेऊन मंजुरीच्या आगोदर तीस ते चाळीस हजार रुपये रेट सर्रास ठरलेला आहे. यात ग्रामसेवक, लिपीक, अधिकारी असे वाटप ठरलेले आहे. शासनाच्या योजनेवर अनेक दलाल सध्या पोसले जात आहेत.
गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी जनजीवन मिशनचे कामे सुरू आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही उन्हाळ्यात गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मग हे कोट्यवधी रुपये जातात कुठे यात अनेक पांढरे बगळे पोसले जात आहेत. यात अनेक अधिकारीही हात धुवून घेतात. सध्या मात्र जामखेड तालुक्यात खूपच भयानक प्रकार सुरू आहेत. गोरगरीब शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. मध्यस्थ आणि दलालांची यंत्रणा मोडित निघणे आवश्यक आहे. नागरिकांनी गुप्तपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून लाचखोरांना धडा शिकवणे आवश्यक आहे.
चौकट
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,अहमदनगर.
@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677
@ टोल फ्रि क्रं. 1064