जामखेड न्युज——
आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून चौंडी शाळेसाठी २.३ कोटी
आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची कीव येते – आमदार रोहित पवार
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (ता. जामखेड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी २ कोटी ३ लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. विधानसभेच्या अधिवेशनात याबाबतची मागणी करुन आमदार रोहित पवार यांनी ती पूर्ण करुन घेतली होती. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज या शाळेला घसघशीत निधी मंजूर झाला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सन २०२२-२३ चा अर्थसंकल्पीय सादर करताना तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी महापुरुषांचे जन्मस्थळ किंवा वास्तव असलेल्या ऐतिहासिक गावांमधील शाळा विकसित करण्यासाठी प्रत्येकी १ कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली होती. त्यामध्ये चौंडी येथील शाळेचा समावेश नव्हता. परंतु चौंडी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असून ही बाब आमदार रोहित पवार यांनी याच अधिवेशनात सरकारच्या निदर्शनास आणून दिली आणि या चौंडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचाही यामध्ये समावेश करुन शाळेसाठी १ कोटी रुपये निधी देण्याची मागणी केली होती. या मागणीला उत्तर देताना तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी ही मागणी मान्य केली. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी सांस्कृतिक कार्यकमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच ३० जानेवारी रोजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनाही पत्र देऊन हा निधी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने शाळेची पाहणी केली असता अनेक वर्षे दुर्लक्ष झाल्याने या शाळेच्या दुरुस्तीसाठी १ कोटी रुपये निधी पुरेसा होणार नाही तर दुरुस्तीसाठी सुमारे अडीच कोटी रुपये लागतील, असा अंदाज काढण्यात आला. त्यानुसार तसे पत्र शिक्षण विभागाने दिले होते आणि या पत्राच्या आधारे सरकारने चौंडी येथील शाळेच्या दुरुस्तीसाठी आणि विकासासाठी २.३ कोटी रुपये निधीला मान्यता दिली आहे.
चौकट
एखाद्याने प्रयत्नपूर्वक केलेल्या कामाचं श्रेय घेतलं तर काही हरकत नाही पण न केलेल्या कामाचं श्रेय घेणारे राजकारणी आज खूप दिसत आहेत. आपलं नाणं खरं असेल तर ते खणखणीत वाजवता आलं पाहिजे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे पाहिले की त्यांची कीव येते. असो! चौंडी येथील शाळेचा या योजनेत समावेश करण्याची माझी मागणी मान्य केल्याबद्दल तत्कालीन अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे आणि बजेटमध्ये मान्य केलेला निधी देण्यासंदर्भात केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन हा निधी मंजूर केल्याबद्दल या सरकारचे मनापासून आभार!
– रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)