जामखेड न्युज——
रक्कदान लोकचळवळ होण्यासाठी युवाशक्तीने पुढे यावे – योगेश अब्दुले

सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून सामाजिक सामिलिकेत सामील होऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना रक्तदान लोकचळवळ जनजागृतीसाठी युवाशक्तीने पुढे यायला हवे.जागरुकतेच्या अभावामुळे अनेक जण रक्तदान करण्यासाठी आजही पुढे सरसावत नाहीत.मानवी रक्ताची गरज कधी न संपणारी असल्यामुळे रक्तदानाची प्रेरणा समाजात दृढ करणे,निरोगी रक्तदात्यांची फौज तयार करून रक्तदात्यांमध्ये स्वैच्छिक जाणीव जागृती करणे,सामाजिक बांधिलकी जोपासून समाजामध्ये रक्तदात्यांविषयी कृतज्ञता निर्माण करण्यासाठी सामाजिक प्रेरणा निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे. थैलेसिमिया,हिमोफिलिया, ल्युकिमिया यासारख्या विकारांनी ग्रस्त असलेल्या पीडित रुग्णांना रक्ताची वारंवार गरज पडत असते अशा रुग्णांना रक्त वेळेवर उपलब्ध न झाल्यास त्यांच्या जीविकास गंभीर धोका निर्माण होतो.अशा रुग्णांना आणि इतर गरजू रुग्णांसाठी रक्तदान करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्य आहे.

रक्तदानाबद्दलची जाणीव जागृती करून रक्तदान आणि रक्तदात्यांची लोकचळवळ उभी करूया असे प्रतिपादन स्नेहालय’चे जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले यांनी केले.”जागतिक रक्तदाता दिन” निमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामखेड येथे ते बोलत होते.यावेळी विचार मंचावर प्राचार्य अजय वाघ,समुपदेशक सुप्रिया कांबळे,स्नेहज्योत प्रकल्प क्षेत्रिय अधिकारी मजहर खान,गट निदेशक नितनवरे,उपप्राचार्य गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी देवगुडे उपस्थित होते.
पुढे बोलतांना अब्दुले म्हणाले की;स्वैच्छिक रक्तदाता म्हणून आपण समाजातील लोकांना जागृत करू तेवढी माहिती जनमानसांत रुजेल. रक्तदानाबाबत अधिकची माहिती घेऊन रक्तदान करण्यासाठी ज्यांचे वय १८ ते ६५ आणि वजन ४८ किलो पेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्ती तसेच क्षयरोग (टीबी),फिरंग, हिपटायटिस,मलेरिया,मधुमेह,एच.आय.व्ही/एड्स या विकारांनी ग्रस्त नसणारे व्यक्ती रक्तदान करू शकतात.निरोगी आणि सुदृढ व्यक्तींद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी केला जातो.यामुळेच तर ‘रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान जीवनदान’ असे संबोधले जाते.मात्र रक्तदान करण्यासाठी बहुसंख्य लोक आजही नकार देतात असे परखड मत’ही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्रामीण रुग्णालय एच.आय.व्ही/एड्स विभागाच्या समुपदेशक सुप्रिया कांबळे यांनी एच.आय.व्ही/एड्स याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी नेत्ररोग चिकित्सक डॉ.स्वाती गायकवाड, ग्रामीण रुग्णालयाचे सचिन बेग,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते नासिर सय्यद विविध क्षेत्रातील मान्यवर,स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी, महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना एन.एस.एस.विभागाने विशेष परिश्रम घेतले.





